सिंधुदूर्ग जिल्ह्याचा इतिहास

महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍यावर व सागरी सुरक्षिततेसाठी अजिंक्य असा जलदुर्ग बांधणे अत्यावश्यक आहे, हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिल्ह्यातील कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर जागेवर सिंधुदुर्ग ह्या किल्ल्याची उभारणी केली. १६६४ मध्ये किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. ते सुमारे ३ वर्षे चालूच होते असा उल्लेख इतिहासात आढळतो. तसेच शिवाजी महाराजांनी पद्मगड, भगवंतगड, सर्जेकोट, भरतगड यांसारखे किल्ले ही बांधले. या सभोवतालच्या किल्ल्यांमुळे सिंधुदुर्गला अधिक सुरक्षा प्राप्त झाली व तो प्रबळ आणि अजिंक्य बनला.

पौराणिक आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णा कालयवन या द्रविड राजाला शिताफीने चुकवून द्वारकेकडून सह्याद्रीकडे आले व त्यानंतर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून कोल्हापूरकडे गेले. ह्या जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारे काही शिलालेख सापडले आहेत. नेरुर येथे सापडलेल्या शिलालेखावरून प्राचीन काळी येथे चालुक्यांची सत्ता असावी असे अनुमान इतिहासकारांनी काढले आहेत,तसंच रामायणातही ह्या प्रदेशाचा उल्लेख आढळतो.

कोकण विभागातील दक्षिण भागाचा विकास जलद गतीने व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. १ मे, १९८१ रोजी, महाराष्ट्र स्थापनेच्या दिवशी सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला.त्याअधी सिंधुदुर्ग हा जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव सिंधुदुर्ग किल्ल्यावरून ठेवण्यात आलं. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*