वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. वाशीम शहराचे प्राचीन नाव वात्सुलगाम होते. प्राचीन काळी होऊन गेलेल्या वत्स ऋषींच्या नावावरून हे नाव पडले असे मानतात. वत्सगुल्म, वंशगुल्म, वासिम वगैरे नावांचाही उल्लेख इतिहासात सापडतो. वाशिम हे नाव मुस्लीम राजवटीत रूढ झाल्याचे मानतात. महाभारत, वात्सायनाचे कामसूत्र, पद्मपुराण, राजशेखरची काव्यमीमांसा, वत्सगुल्ममहात्म्य या प्राचीन ग्रंथांतून तसेच वाकाटक घराण्याच्या कोरीव लेखांतून वत्सगुल्मचा (सध्याच्या वाशिमचा) उल्लेख आढळतो.
वाशिम ही वाकाटकांची राजधानी होती. वाकाटक घराण्याच्या एका शाखेचे हे राजधानीचे ठिकाण होते. पौराणिक कथेनुसार येथील पद्मतीर्थात वासुकी ऋषींनी स्नान केले म्हणून त्यास ‘वासुकी नगर’ असेही नाव पडले. या पद्मतीर्थात अस्थींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. पद्मतीर्थाचा उत्सव कार्तिक शुद्ध एकादशीला होतो. नवव्या शतकातील राजशेखर कवीने वाशिम शहराला विद्या, कला व संस्कृती यांचे केंद्र मानले आहे. वराह-मिहीर या ज्योतिर्विदाने (खगोल शास्त्रज्ञाने) वाशिमला भारताचा मध्य मानले होते. वाशिमवर काही वर्षे राष्ट्रकूट व नंतर यादवांचे राज्य होते. मोगल काळात वाशिम हैदराबादच्या निजामाच्या अखत्यारीत आले. येथे निजामाची टाकसाळ होती. अठराव्या शतकात वाशिम कापड उद्योगासाठी प्रसिद्ध होते.
१ जुलै, १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिमची निर्मिती केली गेली. वाशिम हा विदर्भात स्थापन झालेला दहावा जिल्हा होय.
Leave a Reply