मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
मॅसिडोनिया ह्या नावावरुन ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरु आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला संयुक्त राष्ट्रांमध्ये मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या संयुक्त राष्ट्रे व युरोपाची परिषद ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने नाटो व युरोपियन संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.
रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४६ मध्ये मॅसिडोनियाचा प्रांत स्थापन केला. रोमन सम्राट डायोक्लेशनने मॅसिडोनिया प्रांताचे उपविभाजन करून नवे विभाग निर्माण केले. ह्याच काळात मॅसिडोनियामध्ये ग्रीक व लॅटिन ह्या दोन्ही भाषा वाढीस लागल्या. सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळात स्लाव्ह लोक मोठ्या प्रमाणावर बाल्कन प्रदेशात स्थायिक झाले. तेव्हापासून ह्या भूभागाच्या नियंत्रणावरून बायझेंटाईन साम्राज्य व बल्गेरियामध्ये सतत चकमकी होत राहिल्या. १४व्या शतकामध्ये येथे सर्बियन साम्राज्याचे अधिपत्य आले परंतु लवकरच संपूर्ण बाल्कन प्रदेशावर ओस्मान्यांची सत्ता आली जी पुढील दशके अबाधित राहिली.
२०व्या शतकाच्या सुरूवातीस १९१२ व १९१३ साली घडलेल्या दोन बाल्कन युद्धांनंतर व ओस्मानी साम्राज्याच्या विघटनानंतर मॅसिडोनिया भूभाग सर्बियाच्या अधिपत्याखाली आला. ८ सप्टेंबर १९९१ रोजी मॅसिडोनियाने स्वातंत्र्याची घोषणा केली.
मॅसिडोनियाची अर्थव्यवस्था काहीशी अविकसित असून येथे २७ टक्के बेरोजगारी आहे व येथील वार्षिक दरडोई उत्पन्न युरोपामध्ये खालच्या पातळीवर आहे.
राजधानी व सर्वात मोठे शहर :स्कोप्ये
अधिकृत भाषा :मॅसिडोनियन, आल्बेनियन, तुर्की, रोमानी, सर्बियन
राष्ट्रीय चलन :मॅसिडोनियन देनार
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply