माल्टाचे प्रजासत्ताक हा दक्षिण युरोपातील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा भूमध्य समुद्रामधील एका द्वीपसमूहावर वसला असून तो इटलीच्या सिसिलीच्या ८० किमी (५० मैल) दक्षिणेस, ट्युनिसियाच्या २८४ किमी (१७६ मैल) पूर्वेस, व लिबियाच्या ३३३ किमी (२०७ मैल) उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ ३१६ चौ. किमी (१२२ चौ. मैल), तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व सर्वात घनदाट लोकवस्तीच्या देशांपैकी एक आहे. व्हॅलेटा ही माल्टाची राजधानी असून ती युरोपियन संघामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे. माल्टी व इंग्लिश ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.
माल्टा युरोपियन संघाच सदस्य असून यूरो हे येथील अधिकृत चलन आहे. माल्टाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने येथील पर्यटनावर अवलंबून आहे.
भूमध्य समुद्राच्या मधोमध असलेल्या स्थानामुळे माल्टावर ऐतिहासिक काळापासून अनेक महासत्तांचे वर्चस्व राहिले आहे. इ.स.पूर्व ३३२ मध्ये माल्टा कार्थेजच्या अधिपत्याखाली आला. प्युनिकच्या पहिल्या व दुसऱ्या युद्धांमध्ये माल्टी लोकांनी रोमनांची बाजू घेतली व लवकरच माल्टा रोमन साम्राज्याच्या प्रगत भाग बनले. इ.स.च्या ४थ्या शतकामध्ये रोमन साम्राज्याची फाळणी झाल्यानंतर माल्टावर बायझेंटाईन साम्राज्याचे अधिपत्य आले. ८व्या व ९व्या शतकामध्ये सिसिली व माल्टाच्या अधिपत्यावरून अनेक मुस्लिम-बायझेंटाईन युद्धे झाली व मुस्लिमांनी माल्टावर कब्जा मिळवून तेथील सर्व सुविधा नष्ट केल्या ज्यामुळे माल्टा बेट लोकवस्तीसाठी अयोग्य बनले. परंतु इ.स. १००४८मध्ये मुस्लिमांनी माल्टामध्ये पुन्हा वसाहती निर्माण केल्या. ह्याच काळात अरबीपासून माल्टी भाषेचा उगम झाला. इ.स. १०९१ मध्ये ख्रिश्चन धर्मीय नॉर्मन लोकांनी माल्टावर ताबा मिळवला व लवकरच माल्टा सिसिलीच्या राजतंत्राचा भाग बनले. येथे रोमन कॅथलिक धर्म मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला. माल्टाचे मोक्याचे स्थान लक्षात घेता येथे प्रचंड लष्करी सुविधा निर्माण केल्या गेल्या. १२व्या शतकात माल्टा पवित्र रोमन साम्राज्यामध्ये विलिन केले गेले व दुसऱ्या फ्रेडरिकने येथील सर्व मुस्लिम धर्मीय रहिवाशांची हकालपट्टी केली.
पुढील अनेक शतके युरोपातील विविध घराण्यांच्या ताब्याखाली राहिल्यानंतर इ.स. १७९८ मध्ये नेपोलियनने माल्टा काबीज केले. नेपोलियनने इजिप्तकडे जाताजाता येथे तैनात केलेल्या मोठ्या फ्रेंच सैन्याने माल्टाची लुटालूट सुरू केली ज्यामुळे स्थानिक माल्टी लोक खवळून उठले व त्यांनी फ्रेंचांना येथून हाकलून लावले. ब्रिटिश साम्राज्याने माल्टींना शस्त्रे व दारूगोळा पुरवला. इ.स. १८०० मध्ये फ्रेंच सेनापतीने शरणागती पत्कारली. माल्टी लोकांनी माल्टावर ब्रिटिशांचे अधिपत्य मंजूर केले व माल्टा ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला. १८६९ मध्ये सुएझ कालवा खुला झाल्यानंतर भूमध्य समुद्रातील जलवाहतूकीसाठी माल्टा हा महत्त्वाचा थांबा बनला. ब्रिटनहून भारताकडे जाणारी जहाजे माल्टा येथे थांबत असत. दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्रांनी माल्टाला वेढा घतला व येथे प्रचंड बाँबहल्ला चढवला परंतु ब्रिटिश आरमाराने त्यांना चोख उत्तर दिले व नोव्हेंबर १९४२ मध्ये इटली व नाझी जर्मनीचा येथे सपशेल पराभव झाला.
२१ सप्टेंबर १९६४ रोजी ब्रिटनने माल्टाला स्वातंत्र्य मंजूर केले. पुढील १० वर्षे राष्ट्रकुल परिषदेमध्ये व ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्या औपचारिक अध्यक्षतेखाली राहिल्यानंतर १३ डिसेंबर १९७४ रोजी माल्टाने प्रजासत्ताक पद्धतीच्या प्रशासनाचा अंगीकार केला. १९८० साली माल्टाने तटस्थतेचे धोरण स्वीकारले. १९८९ साली येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व सोव्हियेत संघाचे राष्ट्रप्रमुख मिखाईल गोर्बाचेव ह्यांदरम्यान झालेल्या महत्त्वाच्या बैठकीने शीत युद्धाचा शेवट झाला.
१ मे २००४ रोजी माल्टा युरोपियन संघाचा तर १ जानेवारी २०८ रोजी युरोक्षेत्राचा सदस्य बनला.
राजधानी व सर्वात मोठे शहर :व्हॅलेटा
अधिकृत भाषा :इंग्लिश, माल्टी
राष्ट्रीय चलन :युरो
सौजन्य : विकिपीडिया
Leave a Reply