मुंबईच्या बांद्रा उपनगरात समुद्रसपाटीपासून ८० मी. उंच टेकडीवर असलेले माउंट मेरी चर्च ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. आंतरिक सजावटीसाठी हे चर्च प्रसिध्द आहे. या चर्चमध्ये मरियमच्या दोन प्रतिमा आहेत. मेरीला समर्पित हे चर्च टेकडीवर बाधण्यात आले आहे. आठ सप्टेंबर नंतर येणारा रविवार हा येथे धार्मिक वार्षिक सोहळा म्हणून साजरा केला जातो. त्यावेळी होणार्या बांद्र्यातील जत्रेच्या वेळेला हजारोंनी लोक प्रार्थनेसाठी येतात. जत्रेच्या वेळेस हा संपूर्ण परिसर फुलांच्या माळा, रिबिन्स लावून सजवला जातो. अनेक धार्मिक प्रतीके, वस्तू आणि सेव्हरी (savories)विकणारी छोटी मोठी दुकाने इथे थाटली जातात. पवित्र मेरीच्या मेणाच्या आकृत्या आणि शरीरांच्या अवयवांच्या उदा. हात, पाय इत्यादी आकाराच्या मेणबत्त्याही इथे विक्रीकरता असतात.
१६ व्या शतकात पोर्तुगालहून धर्मगुरुंनी मेरीची मूर्ती इथे आणून एक प्रार्थनास्थळ बांधले. इ.स. १७०० मध्ये अरबी चाचांनी या मूर्तीचा उजवा हात तोडून त्या हातातील सोन्याचा मुलामा असलेली वस्तू पळवली. इ.स. १७६० मध्ये या चर्चची पुनर्बांधणी झाली. त्यावेळी जवळच्याच सेंट अॅन्ड्रूज चर्चमधील मूर्ती इकडे आणली. या मूर्तीबद्दल एक दंतकथा सांगितली जाते त्यानुसार एका कोळ्याला स्वप्न पडले की त्याला पवित्र मेरीची मूर्ती समुद्रात मिळेल. त्या स्वप्नाप्रमाणे त्याला ही मूर्ती समुद्रात तरंगत असलेली सापडली.
इ.स.१८७९ मध्ये बोमनजी जिजीभॉय यांनी या टेकडीच्या उत्तरेला पायऱ्या बांधल्या. इ.स.१८८२ मध्ये चर्चच्या इमारतीसमोर एक सभागृहही बांधले. परंतु १९व्या शतकाच्या अखेरीस सप्टेंबर मधील वाढत्या भक्तगणांना सामावून घेण्यासाठी नवीनच चर्च बांधण्याचे ठरवले गेले. शापूरजी चढ्ढाभॉय या वास्तुविशारदाने निओ- गोथिक (Neo-gothic) पद्धतीने नवीन प्रार्थनास्थळाची आखणी करुन ते बांधले. सध्याची चर्चची ही इमारत १०० वर्षे जुनी आहे.
मूर्तीपर्यंत पोचणाऱ्या सात पांढऱ्या संगमरवराच्या पायऱ्या आणि त्यावर तीन शिखरे अशी येथील रचना असून भक्ताची नजर थेट पवित्र मेरी आणि बाळ येशूवर पोहोचते. या लाकडी मूर्तीच्या मुकुटावरून येणारे पांढरे व सोनेरी रंगाचे झगझगीत वस्त्र सर्वात वरच्या पायरी पर्यंत येते. इथे पवित्र मेरीच्या उजव्या हातात येशू दिसतो. चर्चच्या मधील भागात मेरीच्या आयुष्यातील प्रसंग शिल्पांकित केले आहेत.
Leave a Reply