अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापुर शहराची बाजारपेठ एकेकाळी विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजली जायची.
औरंबजेबाचं सैन्यस्थळ अशीही ओळख असलेल्या बाळापूरची ८० टक्के वस्ती मुस्लिम समाजाची असूनही बाळापुरची ग्रामदेवता श्री बाळादेवी आहे. अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बाळापूर या शहराला या देवीच्या नावावरुनच नाव मिळालं आहे.
‘मनकर्णिका’ जी आता ‘मन नदी’ म्हणून ओळखली जाते आणि ‘महेशा’ नदी जी आता ‘म्हस नदी’ म्हणून ओळखली जाते, या दोन्ही नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी उंच टेकडीवर बाळादेवीचं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात बाळादेवी मातेचा सुंदर असा मुखवटा बसवलेला आहे. मुखवट्यावर दोनवेळा उगवत्या सुर्याची थेट किरणे पडतात. ही स्वयंभू देवी असल्याचं सांगितलं जातं.
बाळादेवीच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी ५५ पायऱ्या चढून जाव्या लागतात. लाकडांच्या खांबावर उभं असलेल्या या मंदिराचा १९७८ मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला.
इथल्या मुस्लीमांचाही बाळादेवीच्या अनेक उत्सवांमध्ये सहभाग असतो. त्यामुळे बाळादेवी या गावाला बंधुत्वाच्या एका अनोख्या नात्यात बांधणारी देवता असल्याचं येथील मुस्लीमांना वाटतं.
Leave a Reply