श्री पद्मालय,एरंडोल (अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ) – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. ‘पद्म’ म्हणजे कमळ आणि ‘आलय’ म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते. येथे असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमळांमुळे याला पद्मालय असे नाव पडले असावे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होते. दोन मूर्ती असलेले गणेशाचे हे कदाचित एकमेव मंदिर असावे. उजव्या व डाव्या सोंडेचे एकत्रित गणपती फक्त याच देवस्थानात पाहावयास मिळतात. मंदिरातील या मूर्ती एक सहस्त्रअर्जुनाने आणि दुसरी श्रीशेषाने स्थापन केल्याचा उल्लेख श्रीगणेश पुराणातील उपासना खंडात आढळतो. या मूर्तींना श्रीप्रवाळ गणेश म्हणतात.
एरंडोल येथे पर्शियन भाषेतील शिलालेख सापडला असून, याच ठिकाणचा पांडववाडा प्रसिद्ध आहे. एरंडोल तालुक्यातीलच फरकांडा येथील झुलते मनोरे आश्र्चर्यकारक असून, पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहेत.
पाल (थंड हवेचे ठिकाण) – जिल्ह्यातील यावल या तालुक्यात पाल हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथील वनोद्यान पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे. येथील चोपडा तालुक्यात उपनदेव-सुपनदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत.
पाटणादेवीचे मंदिर – पाटणादेवीचे मंदिर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे आहे. प्राचीन काळातील थोर गणित-तज्ञ भास्काराचार्यांचा जन्म इथेच झाला, असा उल्लेख आहे. या ठिकाणी भास्कराचार्य यांनी आपला ‘लीलावती’ ग्रंथ लिहिला असे म्हटले जाते.
भुईकोट किल्ला – पारोळा येथील १७२७ मध्ये बांधलेला भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे हे माहेर.
चांगदेव – चांगदेव हे ठिकाण योगीराज चांगदेव यांचे स्थान म्हणून ओळखले जाते. येथे श्री चांगदेव यांचे (दुर्मिळ) मंदिरही आहे. जिल्ह्यातील अंमळनेर येथे संत सखाराम महाराजांची समाधी व एक तत्त्वज्ञान मंदिर आहे.
बहाळ – चाळीसगावच्या उत्तरेस सुमारे ३० कि.मी अंतरावर गिरणा नदीकाठी वसलेले बहाळ हे गाव ताम्र-पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
जळगाव या शहरास ‘अजिंठ्याचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाते. जळगाव येथून जवळ कानळदे गावाच्या पायथ्याशी गिरणेच्या काठी भूगर्भात कोरलेले शिवमंदिर व चार खोल्यांच्या गुंफा प्रेक्षणीय आहेत. याचबरोबर संत मुक्ताबाई मंदिर, मनुदेवी मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, अनेर धरणाचा परिसर हीसुध्दा आवर्जून पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
थंड हवेचे ठिकाण पाल यावल तालुक्यात नसून रावेर तालुक्यात आहे कृपया नोंद घ्यावी