परभणी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

गौतम ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही परभणी भूमी गौतमी नदीचा उगम येथेच झालेला आहे.गंगाखेड हे गोदावरी नदीच्या तीरावरील प्राचीन धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी नदीच्या काठावर व गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथे संत जनाबाईंची समाधी आहे. येथे तीनशे वर्षांपूर्वी संत आनंदस्वामी यांनी स्थापन केलेले बालाजीचे मंदिर असून बालाजीची वाळूची मूर्ती आहे. हे मंदिर माधवराव पेशवे यांच्या कालखंडातील आहे. गंगाखेड तालुक्यातील राणी  सावरगाव हे ठिकाण श्रीरेणुका मातेचे जागृत देवस्थान मानले जाते.  पाथ्री तालुक्यात गोदावरीच्या तीरावर गुंज या ठिकाणी श्री योगानंद महाराज यांनी  स्थापन केलेले देवस्थान आहे. येथे भव्य मंदिर असून श्री योगानंद महाराजांनी याच ठिकाणी संजीवन समाधी घेतली. जिल्ह्यातील पाथ्री हे गाव शिर्डीच्या श्रीसाईबाबांचे  जन्मस्थान असल्याचे मानले जाते. मुद्गल हे गाव पाथ्री तालुक्यात असून गोदावरी नदीच्या काठावरील हे स्थान मुद्गल ऋषींचे तपस्या स्थान असल्याचे मानले जाते.
येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध असून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. परभणी तालुक्यातील पोखरणी येथे श्री नृसिंहाचे प्राचीन मंदिर असून मंदिरातील शिल्पे व मंदिराचे स्थापत्य प्रेक्षणीय आहे. तसेच याच परभणी तालुक्यात त्रिधारा क्षेत्रही प्रसिद्ध आहे. येथे पूर्णा, दुधना व कापरा या तीन नद्यांचा संगम झालेला आहे. खुद्द परभणी शहरात ‘हजरत तुराबुल हक शाह-दर्गा’ आहे. फेब्रुवारी महिन्यात या दर्ग्याचा उरुस भरतो. जिंतूरच्या टेकडीवरील नेमगिरी येथे दिगंबर जैन मंदिर आहे,हे जैनांचे प्राचीन स्थान असून येथे अनेक तीर्थंकारांच्या मूर्ती आहेत. एक मूर्ती अधांतरी असल्यासारखी दिसते. एका छोट्या  दगडावर ह्या वजनदार मूर्तीचा संपूर्ण भार तोललेला आहे. जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील झुलता दगडी स्तंभ व प्राचीन कुंड हे स्थापत्यशास्त्राचे उत्तम नमूने आहेत. वरील स्थानांबरोबरच धारासूर येथील हेमाडपंती मंदिर व मोरांसाठी प्रसिद्ध असलेला जांभूळबेट तलाव (तालूका पालम) ही प्रेक्षणीय स्थळे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*