आळंदी अर्थात संत ज्ञानेश्र्वरांची संजीवन समाधी, व देहू हे संत तुकारामांचे गाव ही दोन महत्त्वाची तीर्थस्थळे पुणे जिल्ह्यात आहेत. अष्टविनायकांपैकी पाच गणपती महाराष्ट्रात श्री गणपतीच्या आठ मंदिरांना विशेष स्थान आहे.
या अष्टविनायकांपैकी पाच स्थाने पुणे जिल्हात आहेत:-
श्री चिंतामणी-थेऊर, श्री महागणपती-रांजणगाव, श्री मोरेश्र्वर-मोरगाव, श्री विघ्नेश्र्वर-ओझर, श्री गिरिजात्मक-लेण्याद्री – हे ते पाच विनायक होत.
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे श्री खंडोबा.येथील गडावर असलेले खंडोबाचे स्थान प्रसिद्ध आहे. सोमवती अमावास्या या दिवशी यात्रेला येथे लाखो भाविक येतात.नव दांपत्याने कुलदैवताचे दर्शन घ्यावे अशी प्रथा असल्यामुळे, नव्याने लग्न झालेली जोडपी श्री खंडोबाच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात.‘खंडोबाचा येऽऽळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार’ हा खंडोबाचा गजर महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून, जेजुरी-गडावर दर्शन घेताना भंडारा (हळद) मोठ्या प्रमाणावर उधळला जातो. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात असून पुण्यापासून ५० कि.मी. अंतरावर आहे.
भीमाशंकर : भारतातील बारापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत, आणि त्यांपैकी एक पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर येथे आहे. निसर्गरम्य जंगलात, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिरातील श्री शंकराचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात. येथील जंगल (अभयारण्य), नागफणी कडा प्रसिद्ध असून येथूनच पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या नदीचा – भीमा नदीचा – उगम होतो. भीमाशंकर अभयारण्यात शेकरु ही उडणारी खार आढळते. शेकरु (Giant Squirrel) ही खार महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते.
उपरोक्त स्थानांबरोबरच पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपती व ग्रामदेवता-तांबडी जोगेश्वरीचे मंदिर, चतु:श्रुंगीचे मंदिर, पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटातील कानिफनाथ मंदिर,चिंचवड येथील नदीकाठचे गणेश मंदिर व गणेशभक्त मोरया गोसावी यांची समाधी, तसेच संत ज्ञानेश्र्वरांचे बंधू सोपानदेव यांची सासवड येथील समाधी, पुणे शहरातील एका दगडात कोरलेले आठव्या शतकातील पाताळेश्र्वर (महादेवाचे) मंदिर, पुण्यातीलच पर्वती टेकडी-मंदिर; कार्ले – भाजे येथील लेणी, वानवडी येथील महादजी शिंदे यांची छत्री इत्यादी ठिकाणे उल्लेखनीय आहेत.
शनिवारवाडा- पेशव्यांनी बांधलेली किल्लासदृश वास्तू म्हणजे शनिवारवाडा. याच वाड्यात पेशव्यांचे वास्तव्य होते. उपरोक्त किल्ल्यांबरोबरच वज्रगड (ता. पुरंदर), लोहगड (ता.मावळ),भुईकोट किल्ला (चाकण,ता.खेड), तुंग, तिकोणा (मुळशी) हे किल्लेदेखील प्रसिद्ध आहेत. शिवछत्रपतींच्या सैनिकाला मावळा असे संबोधले जात असे ते या जिल्ह्यातील मावळ प्रांतामुळेच. शिरूर तालुक्यातील वढू हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून, या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. या गड-कोटांबरोबरच, जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथ्यावरील खंडाळा, लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे पर्यटनासाठी भारतभर प्रसिद्ध असुन, ही स्थळं मुंबईलाही (रेल्वे व रस्त्याद्वारे) जवळ असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.
Leave a Reply