थिबा पॅलेस – हे रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. या ९७ वर्षांच्या जुन्या राजवाड्याचे ब्रह्मदेशाच्या इतिहासाशी नाते आहे. ब्रह्मदेशात ७ वर्षे सत्ता गाजविलेल्या राजा थिबा याची राजवट इ.स. १८५५ मध्ये ब्रिटिशांनी उलथवली. २७ एकर आणि साडेअकरा गुंठे विस्ताराच्या मोठ्या भूखंडावर एक लाख सदतीस हजार चारशे शहाऐंशी रुपये खर्च करून तीन मजली राजवाडा उभारला गेला आणि १३ नोव्हेंबर, १९१० रोजी थिबा राजा आपल्या परिवारासह येथे राहण्यास गेला.
सावरकर कोठडी – रत्नागिरीतील जयस्तंभ चौकात विशेष कारागृह आहे. या कारागृहात १६ मे ,१९२१ ते ३ सप्टेंबर, १९२३ या दोन वर्षांच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांना बंदी करून ठेवले होते. ही कोठडी आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली आहे.
चिपळूण – येथील श्री क्षेत्र परशुरामाचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे.
रत्नदुर्ग किल्ला (भगवती) – हा किल्ला शिलाहार कारकीर्दीत गोव्याचा राजा विजयदेव ह्याचा मुलगा भोज देव(राजा भोज) याने इ.स. १२०५ मध्ये बांधला असे सांगितले जाते. घोड्याच्या नालेसारखा आकार असलेला,१२० एकर क्षेत्रफळाचा हा किल्ला सुमारे १३०० मीटर लांबीचा व १००० मीटर रुंद आहे. इ.स.१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आदिलशाहाच्या ताब्यातून स्वराज्यात घेतल्याची नोंद सापडते.
जयगड किल्ला – हा किल्ला विजापूरकरांनी बांधला. काही कारणामुळे किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होत नव्हते. कोणीतरी सुचवले, नरबळी द्यावा लागेल. जयबा ह्या तरुणाचा बळी देण्यात आला. त्याच्या इच्छेनुसार किल्ल्याला त्याचे नाव- म्हणजे जयगड असे नाव -देण्यात आले.- अशी कथा सांगण्यात येते. एकूण २० बुरूज असलेला हा किल्ला पुढे संगमेश्वरच्या नाईकांनी विजापूरकरांकडून जिंकून घेतला. शाहू महाराजांच्या काळात हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता
गणपतीपुळे – सुंदर समुद्र किनारा, दाट जंगल आणि अतिथ्यशीलता यांमुळे येथील श्री गणेश मंदिर पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरले आहे. समुद्राच्या विस्तीर्ण किनार्यावर म्हणजे पुळणीवर गणपती प्रकट झाला म्हणून गणपतीपुळे हे नाव पडले. श्री गणेश मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या काळात सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरणे थेट येथील गणेशमूर्तीवर पडतात. गणपतीपुळेपासून ४ कि.मी. अंतरावर पॅरासेलिंग हा प्रकल्प सुरू आहे. समुद्र किनार्यावर भरधाव धावणार्या वाहनाला मागे दोर बांधून पॅराशूटच्या साहाय्यानेसुमारे २५० फूट उंचीवर आकाशविहार करण्याचा रोमांचकारी अनुभव या ठिकाणी घेता येतो. गणपतीपुळ्यापासून १ कि.मी. अंतरावर प्राचीन कोकण म्युझियम उभे राहिले आहे. संपूर्ण कोकणाची ५०० वर्षापूर्वीची समाज रचना, व्यवसाय, इतिहास, वेश भूषा, परंपरा यांचे दर्शन या ठिकाणी होते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटरनी याची उभारणी केली आहे. १३० वनस्पतींचा अनमोल खजिना येथे आहे.
पावस – येथे स्वामी स्वरुपानंद यांचे समाधी आहे.
डेरवणची शिवसृष्टी – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्फूर्तिदायक प्रसंगांवर आधारित ही शिवसृष्टी उभारण्यात आली आहे.
पन्हाळे काजी लेणी – दापोली-दाभोळ रस्त्यावर तेथे कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये २९ गुहा खोदलेल्या आढळतात. सुमारे आठ ते दहाव्या शतकापर्यंत खोदल्या गेलेल्या गुहा १९७० साली उजेडात आल्या.
राजापूर – राजापूर हे गंगेचे स्थान मानले जाते. राजापूरची ही गंगा ठरावीक काळानंतर ( साधारण तीन-चार वर्षांनी ) जमिनीवर अवतीर्ण होऊन सभोवतीच्या चौदा कुंडांमधून वाहू लागते. या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते.
वरील ठिकाणांबरोबरच वेळणेश्र्वर येथील श्रीमहादेव मंदिर; उन्हाळे (राजापूर तालुका), उन्हवरे (दापोली तालुका) येथील गरम पाण्याचे झरे; स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेले पतितपावन मंदिर – ही स्थाने प्रसिद्ध आहेत, याशिवाय वेळणेश्वर, मार्लेश्वर, हेदवी ही धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.
Leave a Reply