सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून १ कि.मी. अंतरावर कुरटे बेटावर असून,छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची उभारणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे व हाताचे ठसे येथे पाहावयास मिळतात.येथे राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदिर बांधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे.
विजय दुर्ग – मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे गावापासून ५२ कि.मी. वर विजय दुर्ग हा किल्ला आहे. तिन्ही बाजूंनी तट असून,सुमारे १८०० वर्षांपासून हे बंदर म्हणून प्रसिध्द आहे. अतिशय प्राचीन असा हा जलदुर्ग म्हणजे मराठ्यांच्या आरमारातील मानाचं पान आहे.
आंबोली – सावंतवाडी तालुक्यातील डोंगराळ भागात व सह्याद्रीच्या रांगेतील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण असून हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाले आहे. आंबोली सुमारे १००० मीटर उंचीवर असून येथे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्याने हे जणू महाराष्ट्रातील चेरापूंजीच आहे.
कुणकेश्वर – देवगडपासून १५ कि.मी. वर असलेल्या शिव मंदिराला कोकणची काशी असे म्हटले आहे. ११०० मध्ये यादवांनी हे महादेवाचे मंदिर बांधले असून,शिवाजी महाराजांनी या मंदीराचा जिर्णोध्दार केला आहे.
भोगवे बीच –वेंगुर्ल्यापासून ३५ कि.मी.वर अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तसंच माडा-पोफळीच्या विळख्यात असलेल्या या गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो.
निवती बीच -भोगवे गावाजवळच समुद्रकिनारा लाभलेला सुंदर बीच म्हणजे निवती बीच. येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल असते.
तारकर्ली –मालवणपासून अवघ्या ७ कि.मी.अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. तंबूत निवास, नावेतून सफर व स्कूबा डायव्हिंगचा आनंद देखील येथे घेता येतो.
सावंतवाडी शिल्पग्राम – येथे पारंपरिक हस्तकला कौशल्याच्या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन सावंतवाडी येथे उभारण्यात आलेले आहे. या शिल्पग्रामात विविध कलात्मक वस्तूंची विक्री केली जाते.
Leave a Reply