वाशिम – येथे पद्मशेखर, बालाजी, राम, मध्यमेश्वर, गोदेश्वर, नारायण महाराज इ. प्रमुख मंदिरे आहेत. येथील पेशवेकालीन बालाजी मंदिर व त्याजवळील देवतळे नागपूरकर भोसल्यांचा दिवाणजी भवानी काळू याने १७७९ मध्ये बांधले. ३०० वर्षांचे जुने असे हे बालाजी मंदिर आहे. तिरुपतीच्या श्री बालाजीचे हे विश्रांतीस्थळ आहे असे मानले जाते. देवतळे ‘बालाजी तलाव’ या नावानेही प्रसिद्ध असून ते चौकोनी आकाराच्या दगडी कठड्याने बंदिस्त केले आहे.
पद्मतीर्थ – हे ठिकाण देखील वाशिम शहरातच आहे. वाशिममध्ये १०८ तीर्थे आहेत. विविध देवता व ऋषींशी ती निगडीत आहेत. पद्मतीर्थ त्यापैकीच एक. हे प्रत्यक्ष श्री. विष्णूने निर्माण केले अशी आख्यायिका आहे.
मध्यमेश्वर मंदिर – हे प्राचीन मंदिर मध्यमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मध्यमेश्वराचे मंदिर हे प्राचीन असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. महाशिवरात्रीप्रमाणेच वैकुंठ चतुर्दशीलाही येथे मोठा उत्सव होतो. येथील पद्मावती तलावही प्रसिद्ध आहे.
कारंजा – दत्त संप्रदायातील श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म कारंजा येथे झाला आहे. हे ठिकाण जैन संप्रदायिकांसाठी देखील महत्त्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. कारंज्यातील नृसिंह-सरस्वती मंदिर व जैन मंदिरे दर्शनीय आहेत. समर्थ संप्रदयातील कल्याणस्वामींचा व भीमदासांचा मठ येथे आहे. या शहरास ‘जैनांची काशी’ असे म्हणतात. येथील ऋषी तलाव प्रेक्षणीय आहे. या शहरास लाडाचे कारंजे असेही म्हणतात. येथे एक प्राचीन व्यापारी पेठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७० साली ह्या शहरावर स्वारी केली होती.
मंगरूळपीर – येथील तर्हाळा हे गाव पठाण लोकांचे पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंगरूळपीर बिरबलनाथाची यात्रादेखील प्रसिद्ध आहे.
पोहरादेवी – मानोरा तालुक्यातील हे ठिकाण बंजारा समाजाचे पवित्रतम क्षेत्र असून येथे भव्य यात्रा भरते.
डव्हा – जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात हे ठिकाण येते. येथे नाथ महाराजांचे व श्री ब्रह्मदेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
लोणी – रिसोड तालुक्यातील हे ठिकाण आहे. येथे सुप्रसिद्ध संत सखाराम महाराज यांचे समाधीस्थान आहे. या साधुपुरुषाच्या स्मरणार्थ बांधलेल्या मंदिरात त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव साजरा केला जातो.
Leave a Reply