उझबेकिस्तान

उझबेकिस्तान, अधिकृत नाव उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तान व किर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

एकेकाळी इराणातील सामानी साम्राज्याचा व नंतर तिमूरी साम्राज्याचा हिस्सा असलेला हा भूभाग इ.स.च्या १६व्या शतकात पौर्वात्य तुर्की भाषाकुळातली उझबेक भाषा बोलणार्‍या भटक्यांनी व्यापला. आधुनिक उझबेकिस्तानातील बहुसंख्य प्रजा उझबेकवंशीय आहे.

इ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हियेत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हियेत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हियेत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.

उझबेकिस्तानाची अर्थव्यवस्था कापूस, सोने, युरेनियम, पोटॅशियम, नैसर्गिक वायू इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादनावर आधारित आहे. बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचे अधिकृत जाहीर धोरण असूनही अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय शासनाची घट्ट पकड आहे. परकीय गुंतवणुकीसाठी ही बाब उत्साहवर्धक नसली, तरीही इ.स. १९९५ सालापासून उदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने नियंत्रित वाटचाल करणार्‍या शासकीय यंत्रणेने केलेले आर्थिक पुनरुज्जीवन आश्वासक आहे. देशांतर्गत व्यवस्थेतील मानवाधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्य यांची स्थिती मात्र विवादास्पद राहिली असून त्याबद्दल आंतरराष्ट्रीय संघटनांकडून उझबेकिस्तानावर टीकाही झाली आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :ताश्केंत
अधिकृत भाषा :उझबेक, रशियन
राष्ट्रीय चलन :उझबेकिस्तानी सोम

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*