मराठी आडनावांचा शोध, संशोधन आणि विचार विवेचन

फार पूर्वीपासून अनेक विद्वानांनी कुटुंबांच्या आडनावांची आणि मराठी आडनावांचीही दखल घेतली आहे. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी, अ. स. १९२४ च्या सुमारास प्रसिध्द केलेल्या त्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात, मराठी आडनावांवर अेक प्रकरण लिहीले आहे. ते लिहीतात…..

…मराठ्यांची आडनावे बरीच जुनी असावीत. शिलाहारापासून शेलारे, प्रमारांपासून पवार, मौर्यांपासून मोरे, चालुक्यांपासून चाळके, पल्लवांपासून पालव, कदंबांपासून कदम अशी मांडणी करण्यात आली आहे. महारांची काही आडनावे पौराणिक कालापासून असणे शक्य आहे. ती नागकुलांच्या नावांवरून निघाली आहेत असे दाखविण्याचा प्रयत्न राजवाडे यांनी अतिहासग्रंथातील कोंकण व नागलोक या लेखात केला आहे. राजांची कुलनामे जशी जुनी तशी ब्राम्हणांचीही जुनी असावीत. राजवाडे यांनी ज्यास गोत्रे असे म्हटले आहे आणि ज्यांपासून आजची आडनावे व्युत्पादिली आहेत, असे शब्द अनेक आहेत.

श्री. वि. का. राजवाडे यांनी अनेक आडनावांच्या पौराणिक व श्रौतसूत्री गोत्रांवरून व्युत्पत्ती लाविल्या आहेत. पण आडनावे व पौराण शब्द यास संयोजक मध्यकालीन प्रामाण्ये सापडत नसल्याने त्या काल्पनिक वाटतात. फाण्टाः पासून फाटक, कौरव्यापासून कर्वे, आकशायेयाः पासून आगाशे, श्वानेयाः पासून साने, आश्मरथ्याः पासून मराठे, गौधिलीपासून गोंधळे, कनिष्ठि पासून कानेटकर, पिंडिकाक्षाः पासून पेंडसे, गाधरायणाः पासून गद्रे वगैरे. परंतू वर्तमानकाळाची आडनावे आणि गोत्रे यांचा मेळ बसत नाही. …

डॉ. केतकरांनी, मराठी आडनावांचे वर्गीकरणही केले आहे ते आजही लागू पडते. भारतीय संस्कृती कोशात पं. महादेवशास्त्री जोशी लिहीतात….आडनाव म्हणजे कुलनाव. कोकणस्थ ब्राम्हणांची आडनावे धंदा किंवा हुद्द्यावरून पडलेली नाहीत. ती कशावरून पडली हा अेक संशोधनाचा विषय आहे असे ना. गो. चापेकरांचे मत आहे. …. प्रा. अ. का. प्रियोळकरांनीही प्रिय अप्रिय हा मराठी आडनावांवर लेख लिहीला आहे.

मराठी आडनावे संग्रहित करण्याचा आणि त्यावर लेख लिहिण्याचा छंद बर्‍याच व्यक्तींना आहे याची जाणीव, वृत्तपत्रातून आणि मासिकातून येणार्‍या लेखावरून होते.

नागपूरचे रामगोपाल सोनी यांनी मराठी आडनावावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यांनी १० हजार मराठी आडनावांचा अभ्यास करून, त्यांची व्युत्पत्ती, महत्व, जात, गोत्र, प्रदेश, मूळ ठावठिकाणा आणि नंतरचे स्थलांतर वगैरे माहिती दिली आहे. त्यांचा प्रबंध मला मिळू शकला नाही परंतू त्यांच्या प्रबंधावर नियतकालिकात आलेल्या भाष्यांची कात्रणे माझ्या संग्रही आहेत. युरोप अमेरिकेतही आडनावांसंबंधी बरेच कुतूहल आहे आणि त्यासंबंधी भरपूर साहित्यही अुपलब्ध आहे. वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून, आडनावांसंबंधीचा मजकूर असलेली शेकडो कात्रणे माझ्या संग्रही आहेत. त्यात अनेक विद्वानांचे लेख तर आहेतच परंतू सामान्य वाचकांच्या, आडनावांसंबंधी बोलक्या प्रतिक्रियाही आहेत.

3 Comments on मराठी आडनावांचा शोध, संशोधन आणि विचार विवेचन

  1. नमस्कार.
    राजवाड्यांनी, (मला वाटतें महाराष्ट्कातील सारस्वतांची ) व पंजाब-काश्मीरमधीलांची आडनांवें/ गोत्रे देऊन संबंध दाखवलेला आहे.
    सुभासष नाईक

  2. १. राजवाडे लेखसंग्रह- लक्ष्मणशास्त्री जोशी. प्र. – महाराष्ट्र सरकार. बहुधा , हा तारापोरवाला जवळ गिरगांव चौपाटीला जो प्रेस आहे, तिथें मिळेल. यात राजवाडे यांचे निवडल लेख आहेत.
    २. राजवाडे यांच्या प्रस्तावना – भाग १ व २ – प्र. – वरदा प्रकाशन, पुणे
    ३. चांगल्या लायब्ररीतही ती पुस्तकें मिळतील.
    ४. तुम्हांला कांहीं विशेष माहिती हवी असल्यास, मी झेरॉक्स करून पाठव्ं शकेन.
    ५. सोनी यांच्या प्रबंभाची कॉपी नागपुर युनि. च्या लायब्ररीत मिळायला हवी. ( कारण पी एच्. डी. च्या प्रबांधाची कॉपी, जिथून पीएच्. डी. कें त्या concerned युनि. ला द्यावी लागते. )
    सस्नेह,
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*