कोणत्याही व्यक्तीत येणारे शारीरिक आणि मानसिक गुणावगुण हे मातापित्यांच्या अनेक पिढ्यांकडून येतात हे आपल्या पूर्वजांच्या बरोबर लक्षात आले होते. हा निष्कर्ष त्यांनी अनुभव आणि निरीक्षणावरून काढला. विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्यपिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोसोम्समुळे येतात. सर्वच सजीव प्रजातींच्या बाबतीत हे खरे आहे. ते अपत्य मुलगा असो की मुलगी असो, अर्धी गुणसूत्रे, म्हणजे २३ गुणसूत्रे (गुणसूत्रांना रंगसूत्रे असेही म्हणतात पण ते चुकीचे आहे) वडिलांकडून व अर्धी गुणसूत्रे, म्हणजे २३ गुणसूत्रे आअीकडून आलेली असतात. म्हणजेच अपत्यावर पितृवंशाचा जेव्हढा अधिकार असतो तेव्हढाच मातृवंशाचाही असतो हे ओघाने आलेच. पुरूषाच्या म्हणजे मानवी नराच्या शुक्राणूत २२ सामान्य गुणसूत्रे आणि १ लिंगदर्शक गुणसूत्र असते. काही शुक्राणूत लिंगगुणसूत्र य (वाय) प्रकारचे तर काही शुक्राणूत ते क्ष (अेक्स) प्रकारचे असते. स्त्रीच्या म्हणजेच मानवी मादीच्या बीजांडातही २२ सामान्य गुणसूत्रे आणि १ लिंगगुणसूत्र असते. मात्र हे गुणसूत्र क्ष प्रकारचेच असते.
पित्याच्या म्हणजे मानवी नराच्या अेका स्खलनात कोट्यवधी शुक्राणू असतात, त्यापैकी सुमारे निम्मे य प्रकारचे तर अुरलेले निम्मे क्ष प्रकारचे असतात. त्यामुळे बीजांडात शिरणारा शुक्राणू नेमका कोणत्या प्रकारचा असेल हे कुणीही ठरवू शकत नाही. अेक शुक्राणू जेव्हा बीजांडात प्रवेश करतो त्यावेळी, तेव्हा त्यातील ४४ सामान्य गुणसूत्रांच्या २२ जोड्या तयार होतात आणि शुक्राणूतील लिंगगुणसूत्र आणि बीजांडातील लिंगगुणसूत्र यांचा संयोग होअून गर्भाची, ४६ गुणसूत्रे असलेली, अेक पेशी निर्माण होते. हाच मानवी गर्भपिंड. गर्भपेशी निर्माण झाली म्हणजे तिच्यात २२ सामान्य गुणसूत्रे पित्याकडून आणि २२ सामान्य गुणसूत्रे मातेकडून अशी ४४ गुणसूत्रे २२ जोड्यांच्या स्वरूपात माातापित्याकडून आलेली असतात.
शुक्राणूतील १ लिंगगुणसूत्र आणि बीजांडातील १ लिंगगुणसूत्र मिळून २३ वी जोडी निर्माण होते. या २३ व्या जोडीत, पित्याकडचे य प्रकारचे आणि मातेकडचे क्ष प्रकारचे गुणसूत्र असेल तर निर्माण झालेला गर्भ मुलाचा असतो. पित्याकडचे क्ष प्रकारचे गुणसूत्र आणि मातेकडचेही क्ष प्रकारचे गुणसूत्र असेल तर निर्माण झालेला गर्भ मुलीचा असतो. यावरून लक्षात येअील की, पित्याच्या शुक्राणूतील लिंगगुणसूत्रच, निर्माण झालेल्या गर्भाचे लिंग निश्चित करते. य प्रकारचे गुणसूत्र ही नरांचीच मक्तेदारी आहे, माद्यांच्या बीजांडात य प्रकारचे गुणसूत्र कधीच नसते. अेखाद्या जोडप्याला मुलीच झाल्या, मुलगा झालाच नाही तर त्याला जबाबदार नवराच असतो.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply