भारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. म्हणजेच कुलनामे वापरण्याच्या, पुरातन काळापासून रूढ झालेल्या परंपरा आहेत.
दक्षिण भारतात, व्यक्तीचे नाव, वडिलांचे नांव, आणि कुलनामाबरोबरच गावाच्या नावाचाही निर्देश करतात.
मराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळे बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे ठिकाणी हजारो मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत. घरात त्यांचे मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला १४ जानेवारी २०१० रोजी २५० वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला भयंकर अपयश आले तर त्या घटनेचे पानिपत झाले असा वाक् प्रचार रूढ झाला आहे.
सदाशिवरावांबरोबर लढाआीत सहभागी झालेले पण जिवंत राहिलेले सुमारे ३०० योध्दे तेथेच स्थायिक झाले. या २५० वर्षात त्यांच्या वारसांची संख्या १० लाखावर पोचली आहे. आता ही सर्व कुटुंबे हरयानवी झाली आहेत. त्यांची आडनावेही बदलली आहेत. पवारांचे पनवार, महालेंचे महालान, जोगदंडांचे जागलान असे परिवर्तन झाले आहे.
तंजावरकडेही बरीच मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply