आपला समाज पुरूषसत्ताक आहे. गेल्या कित्येक शतकापासून प्रत्येक घराण्याच्या अनेक पिढ्यात पुरूषांचीच मक्तेदारी चालू आहे. अपत्याच्या नावासमोर वडिलांचेच नांव लावले पाहिजे आणि वडिलांचेच आडनाव लावले पाहिजे असा दंडक आहे. पित्याचेच गोत्र मुलाला प्राप्त होते.
मुलीला विवाहापर्यंत वडिलांचे गोत्र लावतात तर विवाहानंतर पतीचे गोत्र लावतात याचा अनुभव श्राद्धकर्म करतांना सर्वांना येतो. याला शास्त्रीय आधार नाही किंवा असलाच तर तो कुठेही लिहून ठेवलेला नाही असे मला वाटते.
विवाहानंतर मुलगी, सासरी म्हणजे नवर्याच्या घरी नांदायला जाते. ही प्रथा आपल्याच देशात नव्हे तर सार्या जगातील देशात आणि धर्मात आहे. तिला नवर्याचेच आडनाव आपल्या नावासमोर लावावे लागते.
विवाहानंतर जर वधूचे नावही बदलले तर त्या मुलीची माहेरची संपूर्ण ओळख म्हणजे आयडेंटिटी पूर्णतया पुसली जाते. महिलांवरील अन्यायांची आणि अत्याचारांची सुरूवात येथूनच होते.
नवरा जर बायकोच्या घरी नांदायला गेला आणि त्याने बायकोचे आडनाव आपल्या नावासमोर लावले तर कदाचित फरक पडेल असे वाटते. हुंडाबळींची आणि छळीत सुनांची संख्या बरीच घटेल.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply