माधव महादेव भुरचंडी, हे नाव, माझे मित्र श्री. ठोंबरे यांनी, सप्टेंबर 1982 मधे मला सांगितलं. त्याच बरोबर, भुरचंडी या आडनावाची कुळकथाही सांगितली. माझ्या आडनावकोशात अशी नोंद आहे.
माणसाच्या स्वभावाच्या किंवा शरीराच्या गुणवगुणावरून अनेक आडनावं रूढ झालेली आढळतात. लंगडे, बहिरे, बहिरट, ताठरे, वाचासुंदर, मोठेराव, आळशी वगैरे.
भुरचंडी हे आडनाव, मूळचं भृशूंडी असं होतं. यांच्या पूर्वजांपैकी कुणाला तरी, कपाळावर, दोन भिवयांमध्ये, सोंडेसारखा दिसणारा भला मोठा मस होता. भिवया म्हणजे भृ आणि सोंड म्हणजे शूंडी … म्हणून त्या व्यक्तीचं भृशूंडी असं नाव पडलं. पुढे हे, त्या कुटुंबाचं आडनावच झालं.
अुच्चारतांना, कानाला कठोर वाटणार्या किंवा लिहायला कठीण असणार्या शब्दांचा अपभ्रंश, अुच्चारायला सोप्या, कानाला गोड वाटणार्या किंवा लिहायला सोप्या असणार्या शब्दांकडे होतो. म्हणून भृशूंडी या आडनावाचा प्रवास …. भुरशूंडी ..भुरशंडी … भुरचंडी असा झाला. (प्रसिध्दी : अमृत : फेब्रुवारी 1989)
— गजानन वामनाचार्य
सोमवार 7 सप्टेंबर 2015.
Leave a Reply