आडनावाची खरोखर गरज आहे का ?

Surnames - Are they really required ?

आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते?

विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे?

कुलनाम, आडनाव, सरनेम, फॅमिली नेम, लास्ट नेम वगैरे शब्दांनी परिचित असलेले कुटुंबाचे नाव हे जगभर आवश्यक समजले जाते आणि बव्हंशी प्रत्येक कुटुंबाला असतेच असते. व्यक्तीची आणि कुटुंबाची ओळख म्हणून कायदेशीर दस्तअैवजात किंवा कागदपत्रात नोंदी करण्यासाठी आडनाव ही अेक आवश्यक बाब आहे.

आडनाव प्रचलीत होण्यासाठी प्रथम ते, त्या कुटुंबाने स्वीकारले पाहिजे. काहीतरी कारणामुळे ते स्वीकारले जाते, मग ते पिढ्यान् पिढ्या चालू राहते. अशारितीने प्रत्येक आडनावाला अतिहास असतो. बव्हंशी व्यक्तींना तो माहित नसतो. काहींना तो दंतकथा किंवा आख्यायिकांच्या स्वरूपात माहित असतो. तर काही व्यक्तींनी तो घडविला असतो. अेखाद्या कुटुंबातील व्यक्तिला विचारले की तुमचे आडनाव कसे रूढ झाले? किवा केव्हापासून रूढ झाले? तर ते त्याला नक्की सांगता येणार नाही किवा ती व्यक्ती तिच्या आडनावाबद्दल कांही आख्यायिका सांगेल. ती अैकून तुम्हाला अचंबा वाटेल की अतक्या लहानशा व क्षुल्लक घटनेमुळे, प्रसंगामुळे किंवा बाबीवरून हे आडनाव कसे पडले? म्हणजे रूढ झाले आणि ते पिढ्यानपिढ्या कसे चालू राहिले?

कुणाला वडिलोपार्जित अस्टेट भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी, मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो. पिढ्यानपिढ्या आडनावाचा वारसा चालू राहतो. जगभरची कुलनामे म्हणजेच आडनावे रूढ होण्याच्या पध्दती आणि कारणे जवळजवळ सारखीच आहेत. निवास, व्यवसाय, जात, कर्तृत्व, पद, हुद्दा, स्वभाव, सवयी, गुणावगुण, व्यंग वगैरेंमुळे आडनाव पडते किंवा बर्‍याच वेळी ते समाजाकडून किंवा प्रतिष्ठित व्यक्तीकडून त्या कुटुंबावर लादले जाते.

मराठी आडनावांचे, त्यांच्या स्वरूपावरून, ज्ञातीवरून किंवा अशाच काही वैशिष्ठ्यावरून काही गट तयार करता येतात. मराठी आडनावात, संस्कृती, शिक्षण, संस्कार, चालीरिती, रितीरिवाज, नीतीमत्ता, गरीबीश्रीमंती, विद्वत्ता वगैरेंचा प्रभाव पडला आहे.

कुटुंबाला आणि पर्यायाने व्यक्तीला आडनाव असतेच असते. ही प्रथा जवळजवळ सर्वच देशात पाळली जाते. मराठी समाजही अपवाद नाही. आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी, कुटुंबांच्या आडनावांची प्रथा, मुळात रूढ झाली असाव.

व्यवसायावरून आलेली आडनावे महाराष्ट्रात, भारतातील अतर प्रंातात, अतकेच नव्हे तर अितर देशांतही रूढ झालेली आहेत. पुढे हीच आडनावे जाती निर्देशक झाली. कारण, कुटुंबाचा व्यवसाय पिढ्यान् पिढ्या चालत असे. सोनार, सुतार, कुंभार, धनगर हे व्यवसाय त्या घराण्यातच असल्यामुळे ती अेक जातच समजली गेली. वास्तविक हे अतिशय चुकीचे आहे. सर्व व्यवसाय समान दर्जाचे असतंाना देखील त्यानुसार रूढ झालेली आडनावे जातीवाचक झाल्यामुळे समाजात वेगवेगळे अुच्च आणि नीच स्तर निर्माण झाले. घराण्याचा व्यवसाय बदलू शकतो. आता तर आआी, वडील आणि मुले या सर्वांचे व्यवसाय भिन्न असू शकतात. व्यवसायानुसार आडनाव असण्याच्या प्रघाताला काहीच अर्थ अुरला नाही.

फार पूर्वीपासून अनेक विद्वानांनी कुटुंबांच्या आडनावांची आणि मराठी आडनावांचीही दखल घेतली आहे. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी, अ. स. १९२४ च्या सुमारास प्रसिध्द केलेल्या त्यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशात, मराठी आडनावांवर अेक प्रकरण लिहीले आहे.

श्री. वि. का. राजवाडे यांनी अनेक आडनावांच्या पौराणिक व श्रौतसूत्री गोत्रांवरून व्युत्पत्ती लाविल्या आहेत. पण आडनावे व पौराण शब्द यास संयोजक मध्यकालीन प्रामाण्ये सापडत नसल्याने त्या काल्पनिक वाटतात.

समाजात अेखादे कुटुंब आणि त्या कुटुंबातील व्यक्ती ओळखल्या जाव्यात म्हणून आडनावंाचा वापर केला जातो. म्हणूनच आडनावांना सामाजिकदृष्टया महत्त्व आहे. कोणत्याही समाजात अेकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळतात. नावासमोर वडिलांचे नाव लावले की सारखेपणा कमी होतो, आडनावामुळे तो आणखी कमी होतो.

— गजानन वामनाचार्य

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*