आडनावाचा वारसा – भाग २

The Legacy of Surnames - Part 2

प्रत्येक व्यक्तीचं, बारशाच्या दिवशी, पाळण्यात घालून ठेवलेलं असं अेक स्वत:चं नाव असतं. बव्हंशी स्त्रियांना, लग्नानंतर, नवर्‍याच्या आवडीचं आणखी अेक नाव ठेवलं जातं. म्हणजे लग्नानंतर, तिचं आडनाव आणि नावही बदलल्यामुळं, तिची लग्नापूर्वीची ओळख म्हणजे आयडेन्टीटी पूर्णतया पुसली जाते. व्यक्तीनाव ही, आअी-वडील, वडीलधारे नातेवाअीक किंवा नवरा यांचीच ही नावाची निवड असते. दुसर्‍या कुणी नावं ठेवलेली आपण अजिबात सहन करीत नाही पण वडीलधार्‍या व्यक्तींनी ठेवलेली नावं मात्र, आपण जन्मभर खपवून घेतो.

आडनावाच्या बाबतीत मात्र कुणाचीच आवडनिवड अुपयोगी नसते. पिढ्यानपिढ्या, कुटुंबाचं आडनाव ‘चालत’ आलेलं असतं. वडिलोपार्जित मालमत्ता कुणाला भरपूर मिळते तर कुणाला अजिबात मिळत नाही. पण आडनावाचा वारसा मात्र नको असला तरी मिळतोच मिळतो. हे कुलनाम, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नावासमोर, नाअीलाजानं का होअीना पण अभिमानानं जन्मभर लावीत असते.

आडनाव प्रचलित होण्याआधी, प्रथम ते त्या कुटुंबानं स्वीकारलं पाहिजे. कोणत्यातरी कारणामुळं ते स्वीकारलं जातं आणि पिढ्यानपिढ्या ते चालू राहतं. खटकणारी, विक्षिप्त. विचित्र, निंदाजनक, अपमानकारक अशी आडनावं, त्या कुटुंबावर कधीकाळी लादली गेली आणि ती पिढ्यानपिढ्या सक्रीय राहिली असावीत असं वाटतं.

अशारितीनं प्रत्येक आडनावाला अेकप्रकारचा अितीहास असतो. काही कुटुंबांना तो, दंतकथा किंवा आख्यायिकांच्या स्वरूपात माहित असतो तर काही व्यक्तींनी तो अेखादा पराक्रम गाजवून घडविला असतो. अेखाद्या कुटुंबातील व्यक्तीला विचारलं की तुमचं आडनाव कसं रूढ झालं किंवा किती पिढ्यांपूर्वी रूढ झालं तर ते त्यांना खात्रीपूर्वक सांगता येणार नाही किवा अेखादी आख्यायिका सांगेल. ती अैकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की अितक्या क्षुल्लक घटनेमुळं, प्रसंगामुळं किंवा बाबीवरून हे आडनाव कसं पडलं? म्हणजे कसं रूढ झालं आणि ते, कसंही असलं तरी, पिढ्यानपिढ्या कसं चालू राहिलं?

आडनावांच्या बाबतीत बरीच क्रियापदं वापरली जातात. आडनाव पिढीजात चालत आलं, पडलं, रूढ झालं, घडलं, घेतलं, दिलं, सोडलं, धारण केलं, पुसलं, आडनावाचा त्याग केला वगैरे.

आजची काही आडनावं :: खरे-खोटे,
काळे-गोरे-पांढरे-सावळे-हिरवे-पिवळे-निळे-जांभळे-भुरे-करडे-शेंदरे-तांबडे, लहाने-लांबे-लांबट, दांगट-लुकडे-लुळे, धोत्रे-लुगडे-सदरे-लंगोटे-परकुटे, अुखळे-मुसळे, झारे-सराटे-पराते, चिमणे-कावळे-घारे, गीध-गरूड, लांडगे-कोल्हे-अस्वले, अुन्हाळे-हिवाळे-पावसे, कडू-गोड-आंबटकर, सुखी-दु:खी, हासे-रडके-रडे, शहाणे-गाढवे-वेडसे, ढेकणे-चिलटे-डास, नागवेकर-कपडेकर वगैरे अनेक.

1 Comment on आडनावाचा वारसा – भाग २

  1. ‘लग्नानंतर, तिचं आडनाव आणि नावही बदलल्यामुळं, तिची लग्नापूर्वीची ओळख म्हणजे आयडेन्टीटी पूर्णतया पुसली जाते’. हें एक वाक्यच स्त्रीबद्दल खूप कांहीं सांगून जातें ! बिचारी आधी अमक्याची पुलगी, मग तमक्याची पत्नी, व नंतर फलाण्याची आई हीच ओळख घेऊन जगते. तरी आता गेली ७०-८० वर्षें परिस्थिती बदलली आहे. तरीही, ध्यानात घ्या की, हिलरी रोथॅम ला हिलरी क्लिंटन व्हावें लागलें. तिचेंही आडनांव बदलायचें थांबलें नाहीं. आज तिनें जर अमेरिकन प्रेसिडेंटच्या निवडणुकीत हिलरी रोथॅम म्हणून मत मागितलें तर किती लोक तिला त्या नांवानें ओळखतील, प्रश्नच आहे. More Later.
    – सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*