समाजात अेखादे कुटुंब आणि त्या कुटुंबातील व्यक्ती ओळखल्या जाव्यात म्हणून आडनावांचा वापर केला जातो. म्हणूनच आडनावांना सामाजिकदृष्टया महत्त्व आहे. कोणत्याही समाजात अेकाच नावाच्या अनेक व्यक्ती आढळतात. नावासमोर वडिलांचे नाव लावले की सारखेपणा कमी होतो, आडनावामुळे तो आणखी कमी होतो. ही तीनही नामे सारखीच असणार्या व्यक्तीही असू शकतात. अशावेळी मुळ गाव, व्यवसाय वगैरे कसोट्या लावाव्या लागतात. आडनावांच्या अुत्क्रांतीत या बाबींचा हातभार लागला आहे. व्यक्तीचे नाव वडीलधार्या माणसांनी ठरविलेले असते आणि ते व्यक्तीच्या जन्मानंतर ठेवले जाते परंतू आडनाव पिढ्यान् पिढ्या चालत आलेले असते आणि ते समाजाने किंवा कुण्या अज्ञात अिसमाने ठरविलेले असते किंवा त्या कुटुंबावर लादलेले असते आणि ते त्या कुटुंबाने नाअीलाजाने स्वीकारलेले असते.
आडनाव रूढ झाले ते अेखाद्या व्यक्तिचा कुलनिर्देश करण्यासाठी. कुलनामाचा अनेक प्रकारांनी सामाजिक अुपयोग होअू शकतो हे आपल्या पूर्वजांनी नेमके ओळखले होते. माणसाचे गुणावगुण हे आनुवंशिक असतात हे आपल्या पूर्वजांना अनुभवाने कळून चुकले होते. मुलामुलींचे विवाह जुळवितांना आनुवंशिक गुणावगुणांचा विचार करणे योग्यच होते. विवाहानंतर त्या जोडप्याला होणारी संतती दिसायला कशी असेल? स्वभावाने कशी असेल? बुद्धीने कशी असेल? अपत्यांची शारीरिक ठेवण कशी असेल? हाच विचार, विवाह जुळवितांना मुलाच्या आणि मुलीच्या याच बाबींचा विचार नक्की केलाच जातो. विवाह जुळवितांना आनुवंशिक असाध्य रोग त्या अपत्यांना होअू न देण्याची काळजी घेतली जाते. या सर्व बाबी मुलामुलींच्या वंशावळीवर अवलंबून असतात हे अनेक पिढ्यांच्या अभ्यासावरून त्या काळच्या समाजातील विचारवंतांच्या लक्षात आले होते. म्हणूनच वंश किंवा कुळ ओळखण्यासाठी रूढ केलेला अुपाय म्हणजे ‘कुलनाम’ रूढ झाले हे अुघड आहे.
तुमचा वंश, तुमचे कुळ यालाच पूर्वी आणि आजही ‘जात’ असे संबोधिले जाते. कारण जातीसंस्था ही पुरातन कालापासून अस्तित्त्वात आली होती. चार वर्ण आणि जाती ह्या संकल्पना वास्तविक चांगल्या सामाजिक अुद्देशाने रूढ झाल्या. जन्मतःच तुम्ही आपल्या बरोबर जे जे गुणावगुण घेअून येता ते ‘जात’. आजच्या विज्ञानयुगात ‘जात’ ह्या शब्दाचा अर्थ ‘जन्मतःच’ असा आहे. पण त्या शब्दाला आता विकृत अर्थ प्राप्त झाला आहे त्या शब्दाचे राजकारण केले जात आहे. अेव्हढे मात्र खरे की जातीच्या संकल्पनेने आपल्या भारतीय संस्कृतीवर फार खोलवर परिणाम केले आहेत. त्याचे दुष्परिणाम काही नागरीकांनी पिढ्यान् पिढ्या भोगले आहेत. म्हणूनच जातिवाचक आडनावे धारण करणार्या कुटुंबांना अजूनही निंदा आणि हेटाळणी सहन करावी लागते आहे.
‘जात’ ह्या शब्दाची अुकल आता विज्ञानाने केली आहे. आआीकडून येणारी २३ गुणसुत्रे आणि पित्याकडून येणारी २३ गुणसुत्रे हीच तुमचा पिंड घडवितात. जन्मतःच ही ४६ गुणसुत्रे आणि त्यांना सामावून घेणार्या पेशी घेअूनच तुम्ही जन्माला येता. जन्मतःच जे जे काही तुम्ही घेअून येता ते तुमचे ‘जात’ असा हा आजच्या युगातला ‘जात’ या शब्दाचा अर्थ आहे. आअी वडिलांकडून आलेली गुणसूत्रे दोन्ही कुलांच्या अनेक पूर्वजांकडून आलेली असतात.
व्यवसायावरून आलेली आडनावे महाराष्ट्रात, भारतातील अितर प्रांतात, अितकेच नव्हे तर अितर देशांतही रूढ झालेली आहेत. पुढे हीच आडनावे जाती निर्देशक झाली. कारण, कुटुंबाचा व्यवसाय पिढ्यान् पिढ्या चालत असे. सोनार, सुतार, कुंभार, धनगर हे व्यवसाय त्या घराण्यातच असल्यामुळे ती अेक जातच समजली गेली. वास्तविक हे अतिशय चुकीचे आहे. सर्व व्यवसाय समान दर्जाचे असतांना देखील त्यानुसार रूढ झालेली आडनावे जातीवाचक झाल्यामुळे समाजात वेगवेगळे अुच्च आणि नीच स्तर निर्माण झाले. घराण्याचा व्यवसाय बदलू शकतो. आता तर आअी, वडील आणि मुले या सर्वांचे व्यवसाय भिन्न असू शकतात. व्यवसायानुसार आडनाव असण्याच्या प्रघाताला काहीच अर्थ अुरला नाही. जातीवरून आडनावे रूढ होण्याची प्रथा बरीच जुनी आहे. सुतार, लोहार, सोनार, कुंभार, तेली, माळी, शिंपी, गवळी वगैरे आडनावे बर्याच काळापासून रूढ झालेली आहेत. परंतू आता ही व्यवसायनिदेशक आणि जातीवाचक नावे बदलवून स्थळसंकेती आडनावे धारण करण्याची पद्धत रूढ होत आहे. ‘आडनावात बदल’ अशा नोटिसा वृत्तपत्रात बरेच वेळा वाचनात येतात. काही विशिष्ट परीस्थितीत नाव किंवा आडनाव बदलण्यासंबंधीच्या नोटीसा आपण वर्तमानपत्रात नेहमीच वाचतो. अशा बर्याच नोटिसांची कात्रणे जमवून अेप्रिल १९९२ च्या ‘स्त्री’ मासिकात मी स्वतंत्र लेखच लिहीला आहे. व्यवसायावरून आडनावे घडण्याची प्रथा चालू राहिल्यास संगणके, टीव्हीवाले, भंगारवाले, क्लासवाले, पेपरवाले, पापडकर, लोणचे, केटरर, वेषभूषे वगैरे आडनावे रूढ व्हावयास काही हरकत नसावी.
समाजात, आडनावामुळे तो विशिष्ट कुटुंबगट ओळखला जातो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या आनुवंशिक स्वभाववैशिष्ठ्यांची आणि गुणावगुणांचीही ओळख पटते. विवाह जुळवितांना या माहितीचा फार अुपयोग होतो.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply