अग्निपंख या आत्मचरित्रात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारत असताना दुसर्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंडकाव्यच आहे.
आकाश आणि समुद्र या दोन्ही अमर्याद गोष्टी देवाच्याचं असून छोट्याश्या तळ्यातही तो आहे, या ईश्वराचे अस्तित्व सांगणाऱ्या अथर्ववेदाच्या ओळींनी या आत्मचरित्राची सुरुवात होते. तामिळनाडूमधील रामेश्वरमध्ये आशिक्षित नावाड्याच्या मोठ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. हिंदू-मुस्लिम ऐक्याची भावना जपणाऱ्या वातावरणात त्यांना लहापणीपासूनचं संस्काराची शिदोरी मिळाली. ईश्वराची निस्सीम भक्ती आणि कोणाचंही वाईट न करण्याची वृत्ती ही त्यांच्या आईवडिलांची शिकवण. माध्यमिक शाळेत इयादुराई सालोमन यांच्या प्रेरणेने ते आकाशात उडण्याचे स्वप्न पाहतात. पुढे एमआयटीमध्ये प्रो. स्पॉंडर यांनी त्यांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. शमसुद्दीन आणि जलालुद्दीन यांच्या प्रेमळ सहवासात त्यांच्या कोवळ्या मनाला उभारी देण्याचे बळ दिले. अब्दूल कलाम यांच्या जडणघडणीत त्यांना मिळालेले पोषक वातावरण आणि सुसंस्कृत शिक्षक यांचा अनमोल वाटा आहे याचे वाचकाला प्रत्यंतर येते.
Leave a Reply