१९६९ मध्ये “अभिलाषा’ या चित्रपटाद्वारे जयश्री टी यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट त्या करीत गेल्या. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. काही चित्रपटांतील गाण्यांवर त्यांनी केलेली नृत्येही लोकप्रिय ठरली. शर्मिली या चित्रपटातील रेशमी उजाला है, तसेच मैं सुंदर हूं चित्रपटातील नाच मेरी जान फटाफट, व तराना चित्रपटातील सुलताना सुलताना या गाण्यांवरील नृत्यांनी त्यांना ख्याती मिळवून दिली.
मराठीमध्ये त्यांनी “बायांनो नवरे सांभाळा’, “ह्योच नवरा पाहिजे’, “आपलेच दात आपलेच ओठ’, “गोष्ट धमाल नाम्याची’, “मानाचं कुंकू’, “तूच माझी राणी’ असे काही चित्रपट केले. दादा कोंडके, अमोल पालेकर, अशोक सराफ, यशवंत दत्त, अरुण सरनाईक अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी, हिंदीबरोबरच भोजपुरी, तमीळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आदी जवळपास अठरा भाषांतील चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ५० ते ६० गुजराती चित्रपटांमध्ये जयश्री टी यांनी काम केले आहे.
Leave a Reply