भावगीतगायक जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे यांचा जन्म १९०५ साली इचलकरंजी येथे झाला.
‘अति गोड गोड ललकारी’ या भावगीताने गायक जे. एल. रानडे हे नाव सर्वदूर पोहोचवले. स. अ. शुक्ल या कवीचे शब्द, भीमपलास रागात बांधलेली चाल आणि जे. एल. रानडे यांचा स्वर यांमुळे या गीताने जाणकारांचे चांगलेच लक्ष वेधले. याच काळात अल्लादिया खाँसाहेबांचे सुपुत्र मंजीखाँसाहेब मैफलीत माधव ज्यूलियन यांची ‘ऐकव तव मधुबोल’ किंवा गडकरींची ‘बजाव बजाव मुरली’ या कवितांचे गायन करत. कविता व गायन यांचे सूर जुळू लागले होते.
कवी सदाशिव अनंत शुक्ल हे ‘कुमुदबांधव’ या नावाने काव्यलेखन करीत. रंगभूमीचा उत्कर्ष, बोलपटांचा प्रारंभ, रेडिओचं आगमन, भावगीतांचा आरंभीचा काळ, ध्वनिमुद्रण ही सर्व मन्वंतरे स. अ. शुक्ल यांनी पाहिली.
प्रारंभी भीमपलासी स्वरांची छोटी आलापी गीताच्या चालीत नेऊन सोडते आणि या रागात हे गीत बांधले आहे हे क्षणात कळते. पहिल्या ओळीतील ‘गोड गोड’ हे दोन्ही शब्द ऐकतानासुद्धा गोड वाटावेत अशी त्याची स्वरयोजना आहे. ‘तव न्यारी’ ही स्वरांनी सजविलेली खास जागा ऐकायलाच हवी.
अंतऱ्यामध्ये ‘गिरिधारी’ या शब्दाच्या ‘इ’कारातील आलाप व आळवणी आणि त्यात छोटय़ा तानेची जागा यामुळे गीतसौंदर्य निश्चितच वाढले आहे. त्यापुढची ओळ ‘झुरते राधा मनांत भारी’ ही एकूण ११ वेळा गायल्यामुळे त्यातली भावना व आर्तता वाढली आहे. मधे फक्त दोन वेळा फॉलो म्युझिक पीस आहे. रागविस्तारासह शब्दांना न्याय दिल्यामुळे ही ललकारी प्रभावी ठरली आहे.
जे. एल. रानडे यांना ग्रामोफोन कंपनीने आमंत्रित केले. जुलै १९३४ मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. एक लोकप्रिय गायक म्हणून ते नावारूपाला आले. गायन मैफली होऊ लागल्या. त्यांच्या मैफलीच्या विविध प्रकारे जाहिराती होऊ लागल्या. जाहिरातींत गायकाचे भरपूर कौतुक केलेले असे. ‘रसिकांचे आवडते गायक’ किंवा ‘गायनाचा अपूर्व जलसा’ असा उल्लेख होत असे.
१६ ऑक्टोबर १९५१ या दिवशीच्या ‘लोकसत्ता’ दैनिकातील ‘संगीतसुधा’मध्ये नवीन रेकॉर्डस्च्या जाहिरातीत गायक जे. एल. रानडे यांच्या ‘घायाळ मी शिकारी’ व ‘डोळे तुझे शराबी’ या गीतांचा उल्लेख आहे.
एच. एम. व्ही. कंपनीने १९३४ ते १९५२ या १८ वर्षांच्या कालखंडात या गायकाच्या पन्नासहून अधिक ध्वनिमुद्रिका काढल्या. त्यांची शास्त्रीय रागांच्या बंदिशींसह असंख्य भावगीते श्रोत्यांना आवडली. ‘नवल ही बासरी हासरी’, ‘तू अन् मी करूनी निगराणी’, ‘तू लिहावी प्रेमगीते’, ‘हासत नाचत ये’, ‘बाई आम्ही लपंडाव मांडला..’ अशी त्यांची अनेक भावगीते लोकप्रिय झाली. जे. एल. रानडे या गीतांना ‘भावपदे’ म्हणत.
जे. एल. रानडे यांनी सांगलीमध्ये पुढे बंगला बांधला. आणि त्या बंगल्याचे नावही त्यांनी ‘ललकारी’च ठेवले. यातच भावगीतांची अफाट लोकप्रियता दिसून येते.
जे. एल. रानडे यांचे १९ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले.
Leave a Reply