चित्रकार, कवी प्रभाकर बरवे यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी झाला.
चित्रकारांच्या तीन पिढय़ांवर केवळ दृश्यविचारातून प्रभाव टाकणारे, चित्रकलेशी संबंध नसलेल्या रसिकांनाही ‘कोरा कॅनव्हास’ या अजरामर पुस्तकामुळे माहीत असलेले चित्रकार प्रभाकर बरवे हे १९५९ पासून चित्रकार म्हणून परिचित होऊ लागले एवढय़ा काळात त्यांनी कलाविद्यार्थी, कला-अध्यापक आणि कलासमीक्षकांना प्रभावित केले होते.
१९८० च्या दशकापासून कॅन्व्हासवर तैलरंगांऐवजी घरच्या भिंतीचा ऑइलपेंट म्हणजे ‘एनॅमल पेंट’ वापरून त्यांनी चित्रांना निराळे दृश्यरूप दिले. त्याहीआधी वाराणसीच्या मुक्कामापासून, भारतीय ‘तांत्रिक’ परंपरेतील चित्रेही त्यांनी काढली होती. परंतु बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला.
बरवे यांचे दृश्यकलेखालोखाल प्रेम होते ते कवितेवर. त्यांच्या काही कविता साहित्याला वाहिलेल्या ‘सत्यकथा’ ह्या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांचे आवडते कवी म्हणजे ऑक्टोविया पाझ व बालकवी. त्यांच्या बऱ्याच चित्रांची शीर्षकेही काव्यात्मक आहेत.
प्रभाकर बरवे यांचं ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक मराठीतल्या उत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत गणले जाते.
प्रभाकर बरवे यांचे निधन ६ डिसेंबर १९९५ रोजी झाले.
Leave a Reply