बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे घराणे भिक्षुकांचे. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १८४९ रोजी मिरजजवळील बेगड येथे झाला. त्यांचे वडील रामभट,यांनी भिक्षुकी सोडून साताऱ्याचे बाळाजीबुवा यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. आपल्या मुलानेही गाणे शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले.

तेथील हस्सूखाँचे शिष्य वासुदेवराव जोशी यांच्याकडे तो गायन शिकण्यास गेला. प्रथम वासुदेवबुवांनी गाणे शिकवण्यास नकार दिला. पण पुढे एक वर्षाने बनारस येथे त्यांनी बाळकृष्णबुवांना शिकविण्याचे कबूल करून, पुढे सहा वर्षे चांगले शिक्षण दिले.

श्रीमंत बाबासाहेब घोपरडे, इचलकरंजीकर यांच्याकडे जवळजवळ ३० वर्षे दरबार-गवई म्हणून राहिले. पं. बाळकृष्णबुवा अत्यंत भरतीदार व यशस्वी गायक होते. त्यांची गायकी साधी, निर्मळ, भारदस्त व सौंदर्यपूर्ण होती. खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार महाराष्ट्रात बाळकृष्णबुवांनीच केला. मिरज आणि इचलकरंजी येथे त्यांचेकडे पुष्कळ लोक शिकू लागले.

पहिल्या शाखेत पं. विष्णू दिगंबर पलुस्कर व त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातून शिकून तयार झालेले विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव व शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, वामनराव पाध्ये, प्रा. बा. र. देवधर इ. नामवंत गवयांचा समावेश होतो; तर दुसऱ्या शाखेत मिराशीबुवा, अनंत मनोहर जोशी, त्यांचे चिरंजीव गजाननराव, तसेच शिष्य बापूराव गोखले व त्यांचे शिष्य राजारामबुवा पराडकर इ. प्रसिद्ध गवयांचा अंतर्भाव होतो.

संगीतातील ‘भीष्माचार्य’, ‘गायनाचार्य’ ह्या पदव्या रसिकांनी त्यांना स्वेच्छेने बहाल केल्या होत्या. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे ८ फेब्रुवारी १९२७ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*