मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे झाला.
भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे, भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले.
भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके विशेष गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील पेंढारकर यांनी साकारलेली ‘दिगू’ ही व्यक्तिरेखा अजरामर झाली.
मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३०० नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी करून ठेवले आहे. भालचंद्र पेंढारकर यांनी संपूर्ण आयुष्य ललित कलादर्श या संस्थेसाठी वाहिले. या संस्थेची शतकोत्तर यशस्वी वाटचाल सुरू आहे ती केवळ पेंढारकर यांच्यामुळेच.
भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते.
१ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. भालचंद्र पेंढारकर यांचे निधन ११ ऑगस्ट २०१५ रोजी झाले.
Leave a Reply