समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले.
कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचा परिचय आ. रा. देशपांडे (कवी अनिल) यांच्याशी झाला. मधल्या काळात कुसुमावती लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेल्या. तेथून परतल्यावर त्यांचा कवी अनिलांशी विवाह झाला. दरम्यानच्या काळात उभयतांचा झालेला पत्रव्यवहार हा त्यांच्या ‘कुसुमनिल’ या पत्रसंग्रहात समाविष्ट आहे. प्रथम नागपूर येथील महाविद्यालयात कुसुमावती इंग्रजीच्या प्राध्यापिका होत्या. त्यानंतर १९५६ साली नागपूर आकाशवाणी केंद्रात अधिकारी म्हणून काम पाहिले. कथालेखनापासून कुसुमावतींनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला ‘प्रतिभा’ पाक्षिकात त्यांचे ललित लेख व कथा प्रकाशित झाल्या. नवकथापूर्व कालखंडातील वैशिष्ट्यपूर्ण कथा लिहिणार्या लेखिका म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ‘दीपकळी’, ‘मोळी, ‘दीपदान’ इत्यादी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. व्यत्ति*मनातील आंदोलने टिपणारी, चितनशील, काव्यात्म, रेखीव आणि प्रगल्भ अशी त्यांच्या कथालेखनाची धाटणी होती. त्यांच्या कथेत स्त्रीचे दुखरे मन उमलून येते. छोट्याशा अनुभवाला चितनशीलतेचे परिमाण देत मानवतेला आवाहन करत गाभ्याला हात घालत जीवनकथा लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत होते. ‘चंद्रास्त’, ‘मध्यान्ह’, ‘मध्यरात्र’ हे त्यांचे ललित लेखसंग्रह. यातील त्यांचे लेखन गंभीर असले तरी दर्जेदार आहे. कुसुमावतींचा मराठी कादंबरी या विषयावरचा अभ्यास दांडगा होता. ‘मराठी कादंबरी पहिले शतक’ या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी घेतलेला कादंबरीचा ऐतिहासिक आढावा त्यांच्या मराठी भाषेच्या व्यासंगाचा आणि समीक्षकाच्या शोधक दृष्टीचा प्रत्यय आणून देतो.
कुसुमावती देशपांडे यांचे मराठीसृष्टीवरील विविध लेख.
Leave a Reply