दुर्गा खोटे यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी मुंबई झाला. पूर्वाश्रमीचे त्यांचे आडनाव लाड होते. महाविद्यालयात शिकत असतानाच बॅ. विश्वनाथ खोटे यांच्याशी विवाह झाला. मोहन भवनानींच्या “फरेबी जाल“ या मूक चित्रपटात त्यांना पहिल्यांदा भूमिका देण्यात आली. या चित्रपटातील काही भाग बोलका होता. प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा या पहिल्या हिंदी व मराठी बोलपटातून दुर्गाबाईंनी तारामतीची भूमिका साकारली. “अयोध्येचा राजा“ या पहिल्या मराठी बोलपटात मध्ये दुर्गा खोटेंनी गायिलेली ‘बाळा का झोप येईना’, ‘आनंद दे अजि सुमन लीला’, ‘बाळ रवि गेला’ ही गाणी त्यावेळी अतिशय लोकप्रिय झाली होती. त्यानंतर “सीता“, “पृथ्वीवल्लभ“, “अमरज्योति“, “लाखाराणी“, “हम एक हैं“ ,“मुगले आझम“, “नरसीभगत“, “बावर्ची“, “खिलौना“, “बॉबी“ “अश्या विविध हिंदी चित्रपटांमधून दुर्दाबाई खोटेंनी दर्जेदार व्यक्तीरेखा साकारल्या. त्याचप्रमाणे “गीता“, “विदुर“, “जशास तसे“, “पायाची दासी“, “मोरूची मावशी“, “सीता स्वयंवर“, “मायाबाजार“ यांसारख्या मराठी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
पॉल झिलच्या “अवर इंडिया“ आणि इस्माईल मर्चंट यांच्या“हाऊस-होल्डर“ या दोन इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या होत्या.
१९४८ साला पासून दुर्गाबाईंचा मराठी रंगभूमीशी संबंध आला होता. “बेचाळीसचे आंदोलन“, “कीचकवध“, “भाऊबंदकी“, “शोभेचा पंखा“, “वैजयंती“, “खडाष्टक“, “पतंगाची दोरी“, “कौंतेय“, संशयकल्लोळ या नाटकांमधुन त्यांनी भूमिका केल्या आहेत. १९६१ रोजी दिल्लीमध्ये आयोजित झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
१९८० रोजी दुर्गाबाईंनी आपल्या “ दुर्गा खोटे प्रॉडक्शन ” द्वारे दूरदर्शन मालिका, माहितीपूर्ण ध्वनी-चित्रफित, मराठी-हिंदी चित्रपटांसोबतच शॉर्ट फिल्म्सची निर्मिती या संस्थेतून करण्यात आली.
“धरतीची लेकरं” या दुर्गा खोटे प्रॉडक्शनचा चित्रपट राज्य मराठी चित्रपट महोत्सवातही गौरयाण्यात आले व दुर्गा खोटेंना या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गेला.
२०० पेक्षा ही अधिक चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारत तसंच वैशिट्यपूर्ण दिग्दर्शन कौशल्यामुळे दुर्गाबाईंनी कलाविश्वात सुवर्णक्षरांनी नाव कोरले.
वेळोवेळी दुर्गाबाईंचा सन्मान देखील करण्यात आला. १९४२ च्या“चरणो की दासी” आणि १९४३ सालच्या “भारत मिलाप” या चित्रपटातल्या त्यांच्या भुमिकांना “बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशन”च्या पुरस्कारने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर १९७४ च्या “बिदाई“ चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांना फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले; त्यासोबतच संगीतनाटक अकादमीने १९५८ साली त्यांचा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव केला तर मराठी नाट्यपरिषदेतर्फे विष्णुदास भावे सन्मानपदक, १९६८ साली भारत सरकारच्या “पद्मश्री” आणि १९८४ साली भारतीय सिनेसृष्टीतल्या सर्वोच्च असलेल्या “दादासाहेब फाळके पुरस्काराने“ गौरविण्यात आले आहे.
आपला जीवन व रुपेरी पडद्यावरचा प्रवास दुर्गाबाई खोटेंनी “मी दुर्गा खोटे” या पुस्तकातून शब्दबध्द केले असून या पुस्तकाचं इंग्रजी भाषेत “आय दुर्गा खोटे” नावाने प्रकाशन झाले आहे.
उतारवयात दुर्गाबाई अलिबागच्या एका बंगल्यात स्थलांतरीत झाल्या. २२ सप्टेंबर १९९१ या दिवशी म्हणजेच वयाच्या ८६व्या वर्षी दुर्गा खोटे यांचे निधन झाले.
२०१३ साली भारतीय चित्रपटांच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत सरकारने दुर्गा खोटेंच छायाचित्र असलेलं टपाल तिकिट प्रकाशित करुन त्यांच्या प्रतिभेचा सन्मान केला.
( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )
दुर्गा खोटे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (22-Sep-2016)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (14-Jan-2019)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (7-Oct-2017)
स्मरणीय भूमिका करणार्या दुर्गा खोटे (15-Jan-2018)
## Durga Khote
Leave a Reply