मराठी साहित्यामध्ये चरित्रात्मक लेखन हा प्रकार खुपचं जुना असला तरीपण, मराठी भाषेत चरित्रात्मक पध्दतीचे लेखन करणारे तज्ञ लेखक मात्र अभावाने आढळतात ! त्यातही प्रसिध्द असलेल्या लेखकांची यादी तर आणखीनच कमी आहे. पण या यादीत सर्वात अग्रभागी असणारे नाव जर कोणते असेल तर ते नक्कीच, अरविंद ताटके यांचं आहे . सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक व वैज्ञानिक अशा वेगवेगळ्या पटलांवरती आपल्या कर्तुत्वाच्या व इच्छाशक्तीच्या जोरावर, उज्ज्वल भविष्याची नक्षी काढणार्या कितीतरी दिग्गज व्यक्तींची जीवनशिल्पे त्यांनी शब्दरूपांमध्ये साकारली आहेत. जीवनाकडे प्रेरणादायी व उत्स्फूर्तपणे बघायला शिकवणार्या त्यांच्या या मनोरंजनात्मक चरित्रांद्वारे, त्यांनी मराठी साहित्यखाणीला नव्या संस्कारांची व तत्त्वांची अमूल्य भेटच दिली आहे. प्रत्येक महान व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात भोगलेल्या असंख्य यातना आणि सुखद प्रसंग, त्यांच्या जीवनातील ठळक घडामोडी, त्यांचे कार्य, इच्छाआकांक्षा, स्वप्ने, व भावना अशा अनेक आठवणींचा अचुक लेखाजोखा ते या चरित्रांमधून शब्द बध्द केले आहेत.अरविंद ताटके यांचा जन्म ३१ डिसेंबर १९२३ रोजी दादर येथे झाला. तर त्यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यातील बी. जे. हायस्कुलमधून पूर्ण झाले. आजपर्यंत अरविंद ताटकेंची सुमारे ५४ पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या लेखनाचे पदार्पण धनुर्धारी मधून झाले. सर डॉन ब्रॅडमन, विजय मर्चंट, विनू मंकड, सर गॅरी रॉबर्स, खंडू रांगणेकर, यांसारख्या क्रीडारत्नांच्या कारकिर्दीतील विवीध पैलु अलगदपणे उलगडणारी पुस्तके ताटकेंनी लिहीली. महात्मा गांधी, गो. कृ. गोखले, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर अशा राजकीय व्यक्तिमत्वांची चरित्रे; तर ना. सी. फडके, ग.त्र्यं.माडखोलकर, पु. भा. भावे, आचार्य अत्रें सारख्या अजरामर साहित्यिकांच्या चरित्रांसोबतचं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नेपोलियन, विन्स्टन चर्चिल अशा ऐतिहासिक महापुरूषांची चरित्रे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण लेखनाने अगदी तन्मयतेने पार केला. ही चरित्रे लिहिण्याअगोदर अरविंद ताटके स्वतः त्या व्यक्तित्वांना जगले होते, त्यांचे जीवनविषयक दृष्टीकोन, व जगण्याच्या पध्दतींविषयी त्यांनी खात्रीलायक स्त्रोतांकडून आवश्यक माहिती मिळविली होती. त्यामुळे संशोधन व विचापूर्वक लेखन व परीक्षण करून घेतलेला व्यक्तीवेध, हा त्यांच्या लेखनाला अचुकतेशी जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा होता.
देश विदेशातील वेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रभुत्व गाजविलेल्या तज्ञ व्यक्तींची मराठी वाचकांना ओळख व्हावी या हेतुने त्यांनी पहिल्यांदा हातात धरलेली लेखणी, शेवटपर्यंत तशीच टिकून राहिली होती. “विडा रंगला” हा कथासंग्रह, “झिनी”, “हिरकणी” या कादंबर्या, तसेच पुस्तकांमधून त्यांनी कर्तबगार व्यक्तींचे उलगडलेले अंतरंग, सतत वाचकांच्या भेटीस येत राहिले. उत्कंठावर्धक शैली, व गोष्टी सांगण्या व रंगविण्यामधील त्यांची आत्मियता पाहून वाचकांच्या अंगावर शहारे येतात. एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या वर्णनावरून तिच्या वर्तमानात शिरण्यासाठी, व वाचकांनाही तो संस्मरणीय अनुभव देण्यासाठी लागणारे कौशल्य त्यांना चांगलेच अवगत होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply