नाशिक जिल्ह्यातील कुंभारी गावी जन्मलेल्या रामनाथ मोते यांनी ठाणे जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी येवून नावलौकिक मिळविले. आभ्यासवृत्ती, परिश्रम, व शिक्षण विकासाच्या आंतरिक तळमळीमुळे मोतेंनी दोन वेळा कोकण विभागाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रचंड मतधिक्याने जिंकली. कोकण विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. शिक्षकाची समस्या, व वेदना ती आपली वेदना असे मानून तश्या भावनेने व तीव्रतेने वागण्याचे संस्कार त्यांच्यावर महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केले.
पहिल्या टर्ममध्ये मोतेंनी अनेक शिक्षकहिताचे प्रलंबित प्रश्न अत्यंत कल्पकतेने मार्गी लावले होते. शिक्षण क्षेत्रातील शासन स्तरावर असा एकही प्रश्न राहिलेला नाही, की ज्यांना त्यांचा परिसस्पर्श लागायचा राहिला आहे. कायम विनाअनुदानित धोरणातील कायम शब्द काढण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून तसेच विधी मंडळात त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत; ज्यामध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणात वाढ करणे, अल्पसंख्यांकांसाठीच्या सोयी सवलती मिळवून देणे, शिक्षक-शिक्षकेतरांना ६ वा वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तो तत्काळ लागू करणे, त्रिस्तरीय वेतनश्रेणी, अनुकंपा तत्वावरील नेमणूका करणे, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांना दिली जाणारी सगळी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अंध अपंगांना शाळा, तसेच तंत्रशिक्षण संस्था व त्यातील कर्मचारांच्या समस्यांबाबत, आश्रमशाळा कर्मचार्यांवर होणारे अन्याय, शालेय विद्यार्थ्यांना मिळाणार्या शिष्यवृत्तीधारकांच्या संख्येत वाढ करणे, शिक्षण विभागातील अधिकार्यांकडून होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालणे अशा सर्वच विषयांबाबत ते जागृत राहिले असून विधीमंडळामध्ये त्यांनी या समस्यांना वारंवार वाचा फोडून सरकारला त्याबाबतीत काही ठोस योजना व धोरणे आखण्यास प्रवृत्त केले आहे.
त्यांच्या या कामांचे अहवाल सात खंड निवडणूकी दरम्यान शिक्षक परिषदेने प्रकाशित केलेले आहेत. या कामाशिवाय पत्रकारांना सुरक्षितता, पोलिस कर्मचार्यांचे प्रश्न, प्रदुषण, दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणार्या अश्लिल व हिंसाचारी कार्यक्रमांवर बंदी घालणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी अनाधिकृत बांधकामे असे अनेक समाजहिताचे विषयही विधीमंडळामध्ये उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत. राष्ट्रकुल मंडळाने महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळातील उत्कृष्ठ आमदार हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply