नाना फडणवीस

Phadanvis, Nana

नाना फडणवीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला.

बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या १४ व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी सरदार शिद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात १३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला.

स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणवीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणवीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

4 Comments on नाना फडणवीस

  1. नमस्कार.
    नाना फडणवीस यांच्या बद्दल छान माहिती. ही थोडी आणखी .
    – या आडनांवात ‘नवीस’ हा फारसी प्रत्यय आहे. फडनवीस चें कांहीं ठिकाणीं मराठीत फडणीस झालें.
    – पेशावरून हें आडनांव पडलेलें आहे. जसें – चिटणीस ( चिट्ठीनवीस), वाकनीस, पोतनीस, वगैरे.
    – नाना १४ व्या वर्षीं फडणवीस झालेले नाहींत. १७६१ च्या पानिपत लढाईच्या वेळी ते १९ वर्षांचे होतें. त्या काळात त्यांनी लिहिलेलें आत्मचरित्र, हें मराठीतील एक पुरातन आत्मचरित्र म्हणायला हरकत नाहीं.
    – पानिपतानंतर सहाएक महिन्यांनी नानासाहेब पेशव्याचा मृत्यू झाला. माधवरावाला जरी पेशवा केले गेलें, तरी तो तसा अल्पवयून होता, व म्हणून त्याचे ‘पालकत्व’ राघोबाला मिळाले. पण राघोबाला स्वत: पेशवा व्हायचें होतें. त्यानंतरचें राजकारण कांहीं काळ चाललें. नंतर माधवरावानें राघोबाला कोपरगांव येथें नजरकैदेत ठेवले, व स्वत: पेशवेपदाचा कारभार हातात घेतला. नानांची फडणवीस म्हणून नियुक्ती ही त्यानंतरची घटना असणार. ( सनावळी पाहून त्याची खात्री करून घेता येईल). म्हणजेच, नानांना फडणविशीची वस्त्रें २२-२३ व्या वर्षीं मिळाली असणार.
    – सुभाष स. नाईक

  2. ही पुढील कमेंट. ( विषय पुढला, म्हणून दुसरी कमेंट).
    # सहज आठवलें म्हणून : ही आणखी दोन आडनांवें : पागनीस, पारसनीस.
    # नाना फडणवीसांनी मराठी राज्य सांभाळलें , हें खरें आहे; विशेषकरून नारायणरावाच्या मृत्यूपासून ते सवाई माधवराव वयात येईतो. त्यानें आत्महत्या केली , किंवा त्याचा अपघाती मृत्यू झाला, तेव्हांही नानाच कारभार बघत असत. लेखक ना.स. इनामदार यांनी नानांच्यावरील कादंबरीला योग्य नांव दिलें आहे – ‘शर्थीनें राज्य राखलें’.
    #पण नानांना, महादाजी शिंदे यांना महत्वानें-मोठे होऊं द्यायचें नव्हतें. महादाजींना दिल्लीच्या मुघल पातशहानें जेव्हां ‘मुतालिक’ ही पदवी दिली, तेव्हां नानांनी आक्षेप घेतला, की ही पदवी पेशव्यांना मिळायला हवी. हा महादजींचा मोठेपणा की त्यांनी बादशहाकडून तसें करवून घेतलें. नंतर, नानांशी दिलजमाई करायला महादाजी पुण्याला आलेही होते, पण वानवडीला छावणीत त्यांचें निधन झालें.
    #विजय तेंडुलकारांनी त्यांच्या नाटकात ‘नवकोट नाना’ असा उल्लेख केलेला आहे, तो बरोबर आहे. असा ऐतिहासिक उल्लेख आहे ( एक पत्र आहे) की, अमुक कामासाठी नानांना ५ कोटी रुपये दिले. ( अर्थात, ते त्यातील कांहीं इतरांना वाटणार होते असणार.) . पण, त्यांनी ‘माया’ केली , यावरून त्यांचें राजकीय महत्व कमी होत नाहीं.
    # पण नानांचें मुख्य shortcoming हें आहे की, आपला खरा / मुख्य शत्रू इंग्रज हेच आहेत, ही गोष्ट एकतर त्यांना समजली तरी नाहीं, किंवा त्यांनी ती नजरेआड तरी केली. टिपू सुलतानाचे अवगुण काय असतील ते असोत, पण, इंग्रज आपले मुख्य वैरी आहेत, ही गोष्ट त्यांनें ओळखली होती, व म्हणून तो फ्रेंचांशी संधान बांधून होता. पण, मराठे, निझाम व इंग्रज यांनी मिळून टिपूचा विनाश केला. यात खरें तर, maximum नुकसान मराठ्यांचेंच झालें यात शंका नाहीं.
    # आणि तरीही, नानांचें महत्व मराठी राज्यासाठी मुळीच कमी होत नाहीं. हें यावरूनच दिशून येतें की, नानांच्या निधनानंतर २-३ च वर्षांनी , म्हणजे १८०२-१८०३ ला दुसरा बाजीराव पेशवा यानें इंग्रजांशी करार केला; व अखेरीस १८१८ ला त्यानें पेन्शन घेऊन, पेशवाईच इंग्रजांच्या स्वाधीन केली.
    – सुभाष स. नाईक

  3. नाना फडणवीसांचे वारस हयात आहेत काय नानांना मुलगा नव्हता

    • मिरजेचा एक मुलगा त्यांच्या पश्चाच त्यांच्या पत्नींनी दत्तक घेतले होते.
      ब्रिटीशांनी दत्तक घेण्यास मंजूरी दिली पण हक्काने वेतन दिले नाही.
      पुढचा इतिहास माहित नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.


*