डहाके, वसंत आबाजी

Dahake, Vasant Abaji

कादंबरीकार, कवी आणि समीक्षक असलेले वसंत आबाजी डहाके हे सर्व महाराष्ट्राला साहित्यिक म्हणून परिचयाचे असले तरी एक वेगळा छंद त्यांनी आयुष्यभर जपला आणि तो म्हणजे चित्रकलेचा ! वसंत आबाजी डहाके यांचा जन्म विदर्भातला. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे ३० मार्च १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे झालं. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथील महाविद्यालयातून झाले. तेथूनच त्यांनी बी. ए. ची डिग्री संपादन केली. त्यानंतर नागपूर येथून एम. ए. झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी एका खासगी महाविद्यालयात अध्यापन केले; आणि त्यानंतर शासकीय महाविद्यालयात मराठी विषयाचे त्यांनी अध्यापन केले. साहित्य लेखनाचा त्यांचा प्रवास काव्यलेखनापासून सुरू झाला. त्यांची पहिली कविता ‘सत्यकथा’ मासिकातून छापून आली. मात्र ‘योगभ्रष्ट’ ही त्यांची दीर्घकविता सत्यकथेच्या मे १९६६ च्या अंकात प्रसिद्ध झाली आणि त्या कवितेने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. ‘योगभ्रष्ट’, ‘शुभवर्तमान’ आणि ‘शुनःशेप’ हे त्यांच प्रसिद्ध झालेले कवितासंग्रह. डहाके यांनी चितनात्मक असे जे ललित लेखन केले ते ‘यात्रा-अंर्तयात्रा’ या नावाने प्रकाशित झाले. तर ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या त्यांच्या कादंबर्‍यांनाही प्रसिद्धी मिळाली.

जीवनविषयक ओळख आणि त्यातील मूल्यभाव उलगडवून दाखवत डहाके यांनी समीक्षा लेखन केले आहे. ‘कता म्हणजे काय ?’ ‘कवितेविषयी’, ‘समकालिन साहित्य’ हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ. तर ‘निवडक सदानंद रेगे’ या ग्रंथाचे संपादन आणि प्रस्तावनाही डहाके यांचीच आहे. त्यांच्या ‘योगभ्रष्ट’ या संग्रहाचा इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाला आहे. ‘शालेय मराठी शब्दकोश’ हा ग्रंथ गिरीश पतके यांच्या सहकार्याने प्रसिद्ध. ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश खंड १ आणि २’ आणि ‘वाङ्मयीन संज्ञा-संकल्पना कोश’ या कोशवाङ्मयाचे ते संपादक आहेत. डहाके यांच्या कवितेतला ‘मी’ हा मानवी समाज व्यवस्थेत ग्रासलेला निराश, एकाकी आणि दुःखी असा आहे. पराहीनता, अस्थिरता आणि भय या त्याच्या भावना स्पष्ट होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात असा हा त्यांचा ‘मी’ अजूनही लोकांच्या मनात रूजलेला आहे. त्यांची कविता ही उथळ नसून थोडीशी गंभीर, तत्त्वज्ञानाशी जवळीक साधणारी आहे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या काळातील पिढीची जीवनपद्धती आणि संस्कार मूल्य त्यांच्या लिखाणातून स्पष्ट दिसते.

## Vasant Abaji Dahake

 

1 Comment on डहाके, वसंत आबाजी

Leave a Reply

Your email address will not be published.


*