MENU

विजय तेंडुलकर

लेखक, मराठी नाटककार आणि पटकथाकार

मानवी नातेसंबंधाच्या अनेक कोनांतून विचार करुन आशयघन नाटयसंहिता लिहिणारे, मानवी अस्तित्वातील परस्परविरोधी रंग घेऊन समाजातील विरुपाच्या अंगाचा आपल्या कलाकृतीतून शोध घेणारे आणि रचनेच्या दृष्टीने नाटयसंहितेत प्रयोगशीलता आणणारे समर्थ मराठी नाटककार म्हणून विजय तेंडूलकर यांचा लौकिक आहे. त्यांच्या सशक्त व्यक्त करणारे ते महत्वाचे भारतीय नाटककार ठरले. तसेच त्यांच्या सशक्त पटकथांवर म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली.

विजय धोंडोपंत तेंडूलकर यांचा जन्म इ.स. 1928 साली मुंबईत झाला. गिरगावच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळीत वाढलेल्या तेंडूलकरांचा मन शिक्षणात फारसं रमलं नाही वयाच्या 15 व्या वर्षीच शिक्षण सोडून एका ग्रंथविक्रेत्याकडे त्यांनी नोकरी केल्यावर ते पत्रकारितेच्या क्षेत्रात गेले. `दैनिक नवभारत `, `मराठा` व लोकसत्ता` मधून उपसंपादक म्हणून त्यांनी काम केलं. याच काळात दिवाळी अंकाच्या संपादनासोबत लघुकथा-लेखन त्यांनी सुरु केलं. 1955 साली त्यांनी `गृहस्थ` हे आपलं पहिलं नाटक लिहिलं.

तेंडूलकर मराठी रंगमंचावर अवतरले त्यापूर्वीच मराठी नवकाव्य आणि नवकथा यामध्ये साहित्यबोलीत परिवर्तन सुरु झालं होतं मराठी प्रेक्षक ना जुन्या संगीत नाटकात पूर्ण रमत होतां, ना वरेरकर-रांगणेकर-अत्रे प्रणीत वास्तववादी नाटकाशी पूर्णांगाने नातं जुळवत होता. पर्याय नसल्याने इंग्रजी, युरोपीय रुपातंरित नाटकांवर गुजराण करणार्‍या नव्या प्रयोगशील संस्थांना विजय तेंडुलकरांच्या रुपाने नवशैली घेऊन येणारा, नवा नाटककार मिळाला. साल होतं 1955.

`गृहस्थ` नंतर तेंडुलकरांनी `श्रीकांत ` आणि माणूस नावाचं बेट` (1958) ही नाटकं लिहिली आणि त्यांच्या नाटकांतील नवतेकडे सर्वाचं लक्ष वेधलं गेलं सत्य आणि अभासाचं नातं हा त्यांच्या नाटकाचा गाभाच होता. कावळयांची शाळा, चिमणीचं घर होतं मेणाचं` `भल्याकाका` या या नाटयकृतीतून या नात्याचा गोफ अवतरला. `शांतता! कोर्ट चालू आहे. (1963) या नाटकात तर अभिरुप न्यायालयाच्या खेळातून त्यांनी वास्तव आणि अभासाच्या नात्याचं अनेक स्तरीय दर्शन घडवलं या नाटकामुळे तेंडूलकरांना प्रतिभावान नाटककार म्हणून महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात मान्यता मिळाली. या नाटकांच 16 भाषांमध्ये रुपांतर होऊन देशभर त्याचे प्रयोग झाले. पुढे सत्यदेव दुबे यांनी बी. बी. सी. साठी ने नाटक चित्रितही केलं.

यानंतर तेंडुलकरांनी लिहिलेली महत्वाची नाटकं म्हणजे `गिधाडे` (1971)` `सखाराम बाईंडर` (1972), `घाशीराम कोतवाल` (1973), `पाहिजे जातीचे` `मित्रची गोष्ट` `कमला` (1982) आणि `कन्यादान` आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत तेंडुलकरांनी एकूण 27 नाटकं ,25 एकांकिकां आणि 16 बालनाटयं लिहिली.

तेंडूलकर एक महत्वाचे नाटककार ठरले ते त्यांच्या वेगळया नाटयशैलीमुळे , आशयाच्या व्याप्तीमुळे आणि विविध गुणवैशिष्टयांमुळे. त्यांच्या नवनाटयाचं महत्वाचं वैशिष्टय म्हणजे नाटयात्म नवतेला त्यांनी पूर्वग्रहाने बांधलं नव्हतं. त्यांची कल्पनाशक्तीचा नाटयात्म होती, ते विचारच रंगभाषेत, रंगप्रतिमेत करत होते. त्यामुळे वैचारिक डूब असलेल्या त्यांच्या नाटकांनी व एकांकिकांनी भावनांचा आवेगही समर्थपणे तोलला.

त्यांच्या नाटकांचं दुसरं वैशिष्टय म्हणजे सहज अभिनयाला सुयोग्य ठरले, नटाच्या गळयातून सहज उतरेल अशी खास, सहज सरळ संवादशैली , संवाद सुलभ असूनही आशयाचं गांभीर्य कमी होणार नाही, याची काळजीही त्यात दिसून येते, त्यांच्या रंगमाध्यमाच्या भानातच , नाटयरचनेतच तंत्र सामावून जात होतं.

तेंडुकरांचं नाटक पृष्ठभागावर वास्तवदर्शी वाटलं तरी त्यांच्या पात्रसंकल्पना चिन्ह मीमांसेच्या दृष्टिकोनातून पाहता फार अर्थपुर्ण ठरतात. नायक, नायिका, खलनायक , या चौकटी बाजूला सारुन त्यांनी आपल्या पात्रांकडे पाहिलं, विशेषत सखाराम बाईंडर, गिधाडे, बेबी, शांतता ! कोर्ट चालू आहे` या नाटकांमधील पात्रांचा विचार केला तर असं दिसून येतं की, त्यांनी माणसाचा, मानवी नातेसंबंधांचा वेगवेगळया कोनांतून विचार केला. माणसाची अस्तित्वकोषात चाललेली धडपड कधी ते अलिप्तपणे पाहतात, तर कधी त्यांच्याविषयीच्या अपार करुणेने ! नाटकांतील स्त्री-पात्रांकडे त्यांनी कधी वस्तुस्वरुप पाहिलं नाही. स्त्रीचं रतिप्रेरणेशी असणारं नातं आणि पुरुषसत्ताक वृत्तीचं तिच्याशी असणारं नातं. स्त्री – पुरुष नात्यातील स्वप्नवत काव्य यांचं गुंतागुंतीचं चित्र त्यांनी आपल्या काही नाटकांमधुन केलं.

हिंसा त्यांच्या नाटकात आली ती मानवी अस्तित्वातील अनेक परस्परविरोधी रंग घेऊन. दि पॅटर्न ऑफ ग्राईग व्हायोलन्स इन सोसायटी ऍड इटस रिलेव्हन्स टु कॉटेम्पररी थिएटर` हा त्यांन मिळालेल्या जवाहरलाल नेहरु फेलोशिपचा (1974 – 75 ) विषयच होता. वास्तविक जीवनातील विरुपाचा भरड पोत आणि मानवी जीवनातील नाजूक हळवा पोत याचं नातं शोधणं हा तेंडुलकरी नाटकांचा खरा स्वभाव होता. परंतु हळवेपणाप्रमाणेच दुसर्‍याच्या अस्तित्वात नखं रोवणारी , हक्क गाजवणारी वृत्तीही असते याविषयी न दचकता त्यांनी `मधल्या भिंती सारखी नाटकंही लिहिली. `सखाराम बाईंडर` गिधाडे` बेबी सारखी त्यांची नाटकं अश्लीलतेचे आरोप घेऊन वादग्रस्त ठरली. पण खरे तर, नैतिक न्यायापासून दूर राहून समाजाने औचित्याच्या नावाने केलेली झाकपाक या नाटककाराने उघडी करुन दाखविली, विवाहसंस्थेविषयी ते समाजाला काही प्रश्न विचारत होतें, वा मित्राची गोष्टं सारख्या नाटकातून समलिंगी संबंधाबाबत उघडपणे चर्चा करत होते, ते अनेकांना सहन झालं नाही.

`घाशीराम कोतवाल` या नाटकातून तेंडुलकरांनी समग्र नाटकांचं दर्शन घडवलं . ते घडवताना अनेक लोककलांचा समवाय कसा घडू शकतो त्याचा वस्तुपाठ त्यांनी दिला.

कालानुरुप तेंडुलकरांची नाटयप्रतिभा पटकथालेखनाच्या रुपात व्यक्त झाली. माहितीपटाच्या अंगाने जाऊनही मानवी नाटय उभं करण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी एकूण 19 चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या त्यात मंथन` , निशांत, आक्रोश , अर्धसत्य, या हिंदी चित्रपटांचा , सरदार, या वल्लभभाई पटेलांवरील वृत्तपटाचा, तसेच सामना, सिंहासन, उंबरठा, आणि आक्रीत या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. स्वयंसिध्दा` ही तेंडुलकरांनी लिहिलेली दूरदर्शन मालिकाही बरीच गाजली. नाटककार तेंडुलकरांचं ललित साहित्यातही योगदान आहे. एकूण पाच लघुकथा संग्रह व तीन ललित निबंध संग्रह लिहिणार्‍या तेंडुलकरांनी कादंबरी एक` ही कादंबरी आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात लिहिली.

ललित पत्रकारितेला `कोवळी उन्हे` या सदराच्या रुपाने त्यांनी लक्षणीय देणगी दिली. दैनंदिन सदराला `हार्ड न्यूज`च्या पलीकडे जाऊन मानवी अनुभवाचा छेद दिला. यात रकान्याची शिस्त, दृश्य परिमाण आणि विरामचिन्हांचा नाटयपूर्ण वापर केला. तेंडुलकरांच्या साहित्य -कला क्षेत्रातील महत्वाच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक सन्मान मिळाले. `महाराष्ट्र राज्य पारितोषिक ` (1956, 1969, 1972), संगीत नाटक अकादमी ऍवॉर्ड` (1971), फिल्मफेअर ऍवॉर्ड` (1980 व 1983) , सरस्वती सम्मान` (1993) कथा चुडामणी ऍवॉर्ड (2001) अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. तसेच 1984 साली भारत सरकारने त्यांचा पद्मभूषण` किताब देऊन गौरव केला. या शतकाच्या प्रारंभी मागे वळून पाहताना सामाजिक संघर्षाचे संवेदनाक्षम साक्षीदार, वास्तवातील मानवी नात्यांचा कणखरपणे निर्धाराने अनुभव देणारे लेखक, नाटक आणि इतर माध्यमांवर पकड असणारे कलावंत, सतत ताजेपणाने प्रयोग करणारे, अनुभव देणारे एक लक्षणीय व्यक्तिमत्व म्हणून विजय तेंडुलकर हे नाव ठळकपणे पुढे येतं.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

विजय तेंडुलकर (6-Jan-2018)

विजय तेंडुलकर (20-May-2017)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*