घोगळे, अनंत

अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो. खरं तर या पडद्याआडच्या चळवळ्या नाट्यकर्मींमुळेच ‘प्रयोग’, मग तो कुठला का असेना यशस्वी होत असतो. अशा या व्रतस्थींपैकी एक म्हणजे अनंत घोगळे!

मुंबईत विविध ठिकाणी एकांकिका वा नाट्यस्पर्धा होतात. त्यांचं आयोजन करणं हे जिकीरीचं काम, पण अनंत घोगळेंना हाताशी धरलं की वर्तमानपत्रातल्या वृत्तापासून ते परीक्षक ठरवून ती स्पर्धा यशस्वी व बहारदार होईपर्यंत व तिचा निकाल वर्तमानपत्रात छापून आणण्यापर्यंतची सर्व जबाबदारी हा माणूस केवळ नाटकाच्या वेडापायी पार पाडीत असतो.

दादरचं ‘अमरहिंद मंडळ’, अपना बँकेचा कला क्रीडा विभाग, कामगार कल्याण किंवा राज्यनाट्य स्पर्धा, टिळकनगर, चेंबूरमधील महाराष्ट्र ऐक्यवर्धकची ‘शांता जोग एकांकिका स्पर्धा’, कांदिवलीची अवतरण कला अकादमी, लालबागचं विनायक पाटील स्मृती मंच, नायगांवचं विघ्नहर्ता सेवा मंडळ, टाटा वा महानगरपालिकेच्या आंतर विभागीय स्पर्धा ते थेट रत्नागिरी, वाई, चिपळूण, खोपोलीपर्यंतच्या कितीतरी संस्थांना आधार वाटतो तो याच माणसाचा. अक्षरश: अनंत अडचणींवर मात करीत प्रसंगी स्वत:कडे वाईटपणा घेत, अपमान सहन करीत या माणसाने निरपेक्षपणे गेली ५० वर्षे या रंगभूमीची सेवा केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करवडे हे त्यांचं जन्मगाव, पण रुजले-वाढले ते मात्र गिरणगावात! सातवीत असतानाच ‘बेबंदशाही’ नाटकात त्यांनी प्रथम भूमिका केली. त्यानंतर ‘शंभूराजे’, ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत’, ‘करीन ती पूर्व’, ‘पन्हाळगडाचा किल्लेदार’, ‘बेबीचं लग्न’ यांसारख्या ऐतिहासिक-सामाजिक नाटकातून त्यांनी उत्तम भूमिका वठविल्या आहेत.

लालबाग-परळकडची ‘कामगार रंगभूमी’ ही तशी दुर्लक्षित! अखिल महाराष्ट्रीय रंगभूमीच्या पडत्या काळात याच रंगभूमीने प्रेक्षकवर्ग टिकवून धरला. पदरमोड सोसून वेगवेगळे प्रयोग केले. छोटू जुवेकर, दौलत मुरारी साटम, मुकुंद विचारे, नारायण पेडणेकर, राजा कारळे यांसारखी मोजकीच मंडळी इथे सादर होणर्‍या नाटकांची दखल घेऊन त्याविषयी वर्तमानपत्रांत लिहित असत. १९६२पासून अनंत घोगळे यांनी त्यावेळी प्रसिद्ध होणार्‍या फिल्म केसरी, रिमझिम यासारख्या साप्ताहिकांतून आपल्या रंगभूमीविषयक लेखनाला सुरुवात केली. त्यानंतर सातत्याने गेली ५० वर्षे ते वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, रंगभूमीच्या विविध घटकांवर लिहित आहेत. मग ते मुंबईतलं सांज तरुण भारत असो की चिपळूणमधून प्रसिद्ध होणारं दैनिक सागर असो.

इतरांच्या दृष्टीनं अशाप्रकारचं काम म्हणजे लष्कराच्या भाकर्‍याच, पण स्वत्व न गमावता नाटकाचं पीसं लागलेल्या या माणसाने प्रसंगी संसाराकडे दुर्लक्ष करून आपली समीक्षकाची, पत्रकाराची भूमिका निभावली आहे. यावेळी त्यांना सहकार्य लाभलं ते अनुराधा वहिनींचं. काळाचौकीच्या अभ्युदय नगरात राहणार्‍या घोगळेंनी आपली मंत्रालयातली नोकरी करून हा डोलारा सांभाळला हे विशेष! १९८३ ते ८८ या कालावधीत वसंतदादा पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर ते शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असेपर्यंत त्यांच्या कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. ३५ वर्षे सेवा करून फेब्रुवारी ९४ रोजी घोगळे निवृत्त झाले. तरी नाटकमय झालेली त्यांची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. आज वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात ते तेवढेच कार्यरत आहेत. कुठल्याही सांस्कृतिक चळवळीतील संस्थेने साद घातली की सगळं विसरून घोगळे प्रतिसादासाठी तयार असतात.

( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*