गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक-राजकीय बदलांचा आडवा-उभा वेध घेणारी प्रवीण बांदेकर यांची ‘चाळेगत’ ही कादंबरी कोकणातील सद्यस्थितीची हुबेहूब सावली ठरली आहे. आधी ‘विभावरी पाटील’ आणि आता सोलापूरचा मानाचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार मिळवून बांदेकरांच्या या कादंबरीने समकालातील आपलं वेगळेपण अधोरेखित केलं आहे. अर्थात हे वेगळेपण केवळ कादंबरीच्या विषयात नाही, तिच्या मांडणीतही आहे. लेखकाने स्वत:शीच बोलावं, किंवा दशावतारातील शंकासुराने कथा सांगावी, असा कादंबरीचा साचा आहे आणि हा साचा कोकणातल्या मातीतूनच त्यांच्यात रुजलेला आहे. कारण बांदा-सावंतवाडीचं तळकोकण हीच बांदेकरांची जन्मभूमी, कर्मभूमीही आणि स्वप्नभूमीही. त्यामुळेच या स्वप्नभूमीत गेल्या काही वर्षांत झालेल्या बदलांनी (अर्थात वाईट बदलांनी) त्यांचं मन हळहळलं नसतं, तरच नवल होतं! ‘चाळेगत’ ही प्रवीण बांदेकर यांची पहिलीच कादंबरी! परंतु या कादंबरीसाठी त्यांनी जो अवकाश वापरलाय, तो बालपणापासूनच्या त्यांच्या वाढीत रुजलेला आहे.
प्रवीण यांच मुळ गाव बांदा. पण जन्म आजोळी वेंगुर्ल्याला झालेला होता. वडील कृषिखात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्ताने दर दोन-चार वर्षांनी संपूर्ण कोकणात स्थलांतर ठरलेलं होतं. यानिमित्ताने संपूर्ण कोकण केवळ जाणिवेतच नव्हे, तर नेणिवेतही बांदेकरांच्या मनात वस्तीला आलेलं. तरीही वेंगुर्ल्याशी त्यांची अतूट नाळ जुळलेली. कारण महाविद्यालयीन शिक्षण वेंगुर्ल्यातल्या बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात झालेलं. तिथेच त्यांना गुरूनाथ धुरी नावाचा खरोखरचा गुरू भेटला, ज्याने बांदेकरांची साहित्यामधील विलक्षण आवड जोपासली. नंतर इंग्रजीत एम.ए. करायला बांदेकर गोवा विद्यापीठात गेले आणि तिथे त्यांना भालचंद नेमाडे नावाचा महागुरू भेटला. नेमाडेंमुळे बांदेकरांचं साहित्याचं-विचाराचं क्षितिज व कक्षा आणखीनच रूंदावल्या. शिक्षण पूर्ण होताच बांदेकर सावंतवाडीच्या आर.पी.डी. ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि त्यांच्यातल्या कवी-लेखकाचा खरा विकास तिथेच झाला. कारण त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला खतपाणी घालणारं वातावरण सावंतवाडीत होतंच, पण कुठल्याही सर्जनशीलतेच्या मशागतीसाठी ज्या मार्गदर्शक आणि संवादी मित्रांची गरज असते, तीही सावंतवाडीने पूर्ण केली.
दिवंगत कवी वसंत सावंत आणि संवादी कवीमित्र वीरधवल परब, अजय कांडर आणि अनिल धाकु कांबळी सावंतवाडीतच बांदेकरांना भेटले. वसंत सावंत यांनी स्थापन केलेली ‘सिंधुदुर्ग साहित्य संघ’ हेच या बहुतेकांचं पहिलं व्यासपीठ होतं. बांदेकरांनी पहिली कविता या साहित्य संघाच्या व्यासपीठावरच वाचली. ‘येरू म्हणे’ हा बांदेकरांचा पहिला कविता संग्रह ‘शब्दालय’ ने प्रकाशित केला होता. त्यानंतर ‘खेळखंडोबा’ हे दीर्घकवितेचं आणि ‘घुंगुरकाठी’ हे ललितलेखांचं पुस्तक प्रसिध्द झालं. तर ‘चाळेगत’ ही कादंबरी पुन्हा ‘शब्दालय’ नेच प्रसिध्द केली.
कोकणी वातावरणाचा आणि तिथल्या थेट भाषेचा पुरेपूर फायदा उचलत बांदेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भीषण बदलांचं धीट चित्रण या कादंबरीत केलं आहे. तो एक सामाजिक-राजकीय दस्तावेजच आहे. या बदलाला कारणीभूत असलेल्यांचाही त्यांनी खरपूस समाचार कादंबरीत घेतला आहे. अशा या कादंबरीला मिळालेला ‘दमाणी’ पुरस्कार हा बांदेकरांच्या साहित्यिक कर्तृत्वाला मिळालेली पोचपावती तर आहेच, पण त्यांच्या सामाजिक-राजकीय भानालाही दिली गेलेली ही दाद आहे.
( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )
Leave a Reply