आत्माराम सदाशिव जयकर यांनी प्राणीशास्त्राच्या विशाल व समृध्द जगतात जे काही नवे व वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचे शोध लावले, त्यांद्वारे त्यांनी सातासमुद्रापार मराठीचा झेंडा रोवण्यात, व सर्वसामान्य मुंबईकरांची व पर्यायाने सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावण्यात लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. लहानपणापासून प्राणीप्रेम हा त्यांच्या स्वभावातील विलोभनीय पैलु होता. जयकरांच्या प्राणीप्रेमाला त्यांच्यामधील कुशाग्र बुध्दीच्या व कमालीच्या चिकीत्सक अशा संशोधकाची उत्तम जोड मिळाल्यामुळेच ते प्राणीशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या व आकलनक्षमतेचा कस लावणार्या क्षेत्रात त्यांच्या नावाची अजरामर मोहोर उमटवू शकले. मस्कत मध्ये त्यांनी 30 वर्षे वास्तव्य केले व तिथल्या रमणीय व नेत्रसुखद प्राणीखजिन्याचा मनमुराद आनंद लुटत त्यांनी अनेक नव्या जातींच्या रंगीबेरंगी मास्यांवर, व समुद्राच्या आतमधील असंख्य प्राण्यांवर संशोधन केले व ते प्राणी व्यवस्थितपणे त्यांच्या संग्रही जतन करून ठेविले. अरबी समुद्राच्या किनारी येणार्या तर्हेतर्हेच्या माशांचा पुरेसा साठा जमल्यावर ते सारे मासे त्यांनी ब्रिटनमधील नॅचरल हिस्टरी म्युझियमकडे सुपुर्द केले. प्राणी संशोधन क्षेत्रात अनोखी क्रांती घडवल्याबद्दल जयकरांनी शोधुन काढलेल्यांपैकी बावीस नव्या समुद्री मास्यांना त्यांचे नाव देवून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला गेला.
मास्यांबरोबरच जयकरांनी अतिशय दुर्मिळपणे जमिनीवर आढळून येणार्या दोन प्रकारांच्या सरड्यांचा व सर्पांचासुध्दा शोध लावला. बकर्यांची एक वेगळी जमात जयकरांच्या चणाक्ष बुध्दीच्या पटलाबाहेर जावू शकली नाही, व त्या विशीष्ठ बकर्यांना आजही प्राणीशास्त्रात ‘हेमिट्रॅगस जयकरी’ असे संबोधतात.
त्यांचा जन्म मुंबईमधला. प्रथम भारतात व नंतर विलायतेत जावून वैद्यकशास्त्राचे शिक्षण पुर्ण केलेल्या जयकरांनी इंडियन मेडिकल सर्व्हिस मध्ये अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम केले. नंतर तिथून मस्कतला त्यांची नेमणूक झाली. तिथे आजारी व्यक्तींची मोठ्या प्रेमाने देखभाल करत असताना ते आपल्यामधील संशोधकाला तिथल्या मातीत रूजवु लागले. मस्कतमधील रम्य व विवीधरंगी प्राणी व पक्षीजीवनाने त्यांना विलक्षण ओढ लावली होती. परंतु त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीच्या संशोधक पंखांनी केवळ अंधारात असलेल्या प्राण्या-पक्ष्यांनाच आपल्या कवेत घेतले अस नाही तर, शोधनिबंध लिहीण्यामध्येही त्यांना प्रचंड रस होता. मस्कतला गेल्यानंतरच्या पहिल्याच वर्षी लिहिलेला ‘मेडिकल टोपोग्राफी ऑफ मस्कत’ हा त्यांचा पहिलाच शोधनिबंध जगभरातल्या वैज्ञानिक मंडळींनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता.
Leave a Reply