कोसंबी, दामोदर धर्मानंद (डीडी)

समाजात काही माणसे अशी असतात,  की जीवनातील अनेक क्षेत्रे व नाण्याच्या दोन्ही बाजू उत्तमपणे हाताळण्याची कला त्यांना उत्तम अवगत असते. एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे किंवा एकाच क्षेत्रात पुर्णपणे बुडून, त्यात भव्य दिव्य असे काहीतरी मिळवावे असली तत्वे त्यांना कधीच रूचत नाहीत. जीवनाच्या विवीधांगी विचारधारांमधे, मतप्रवाहांमधे, किंवा कलाकौशल्यांमधे सतत डुबकी मारण्याचा त्यांचा स्वभावच असतो व त्यांच्यासमोर पसरलेल्या विभीन्न व्यावसायिक, तांत्रिक, माहिती, संशोधन, कला, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांच्या जाळ्यामध्ये ते तितक्याच तन्मयतेने व आत्मीयतेने काम करीत असतात. अशाच एका अत्यंत चळवळ्या व विज्ञानाच्या विवीध वाटा कोळून प्यायलेल्या संशोधकाचे नाव म्हणजे दामोदर कोसांबी.

दामोदर कोसांबी यांनी गणित व इतिहास या दोन्ही विषयांना आपला परिसस्पर्ष दिला आहे. संख्याशास्त्रामध्ये त्यांचे योगदान भरीव व कौतुकास्पद असले तरी ते आयुष्यभर आकडेमोडींमध्ये रमले नाहीत, तर ऐतिहासीक नाण्यांच्या संदर्भातली अनेक न उमगणारी कोडी त्यांच्या संशोधनातून सोडविली गेली. चिनमधील अन्न धान्यांच्या पिकांचा अंदाज, तसेच औद्योगिक क्षेत्रातील मालाचा दर्जा वर्तविण्यासाठी त्यांनी संख्याशास्त्राचा उपयोग केला. धरणे कोठे, केवढी व कशी बांधावीत, हे ठरविण्यासाठी त्यांनी संख्याशास्त्रीय पध्दती वापरून सुचविलेले निष्कर्ष राष्ट्रीय पंचवार्षिक योजना समितीने मान्य केले. भरभराटीच्या काळात खुप वापरली गेल्यामुळे नाणी अधिक झिजतात, असा सिध्दांत मांडून अनेक कालखंडातली नाणी जमवून त्यांनी प्रत्येक नाण्याचे काटेकोर वजन केले. तिथेही त्यांनी त्यांची आवडती संख्याशास्त्रीय पध्दती वापरून गुप्तकाळ हाच भारताचा सुवर्णकाळ हे सिध्द केले. संख्याशास्त्रावर व इतिहासावर प्रभुत्व गाजवतानाच त्यांनी ऐतिहासीक खुणांच्या शोधकर्त्याची भुमिकादेखील अगदी चोख बजावली. दोन किंवा अधिक व्यापारी हमरस्ते मिळतात तिथे गुंफा किंवा लेणी हमखास आढळते, या त्यांच्या विधानावरूनच एका निर्जन

व काळोख्या साम्राज्याच्या मिठीत विसावलेली, लेणी वायुदलाच्या मदतीने शोधण्यात आली. या लेणीच्या सापडण्यामुळे त्या ठिकाणचा सारा इतिहास तपशील वार सांधण्यात इतिहासकारांना यश मिळाले होते. याचबरोबर त्यांचा ‘इंट्रोडक्शन टु द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री’ हा अद्वितीय ग्रंथ जगभरच्या इतिहासकारांनी डोक्यावर घेतला होता. हा ग्रंथ त्या काळच्या ऐतिहासीक लेखनामध्ये आजही मैलाचा दगड मानला जातो.

अनेक युरोपीय व प्राचीन भारतीय भाषा व तत्वज्ञान यांचा सर्वात परिपूर्ण, अद्ययावत व खात्रीशीर ज्ञानकोष म्हणजे दामोदर कोसांबी हे होते. भाषाशास्त्रातही त्यांनी बरेच संशोधन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*