मूळ संख्याशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या सुखात्मे यांनी कृषीउत्पादनाच्या तसेच पोषण आणि आरोग्य या क्षेत्रात लक्षणीय भर घातली. कृषिसंशोधनासाठी, तसेच पिकासंबंधींच्या प्राथमिक माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार्या अनेक संख्याशास्त्रीय पध्दतींचा विकास त्यांनी केला. भारतीय कृषिसंशोधन परिषदेचे संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणून कृषिसंशोधनाचा पाया भक्कम करण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. पिकांच्या संकरित जातींचा विकास करण्यासाठी लागणार्या संशोधनासाठी त्यांनी संख्याशास्त्राचा परिपुर्ण पायाच तयार केला.
पुढे जागतिक अन्न आणि कृषिसंस्थेच्या संख्याशास्त्र विभागाचे संचालक म्हणुन काम करत असताना जगातील अन्न धान्य समस्येचा सखोल आभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातूनच जगातील दोन तृतियांश जनता उपासमारीची आणि कुपोषणाची बळी असल्याचा प्रगत, श्रीमंतदेशांचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पोषक आहार आणि रोगराई या दोन घटकांवर आरोग्य अवलंबून असले तरी ग्रामीण भागात आहारापेक्षाही रोगनिर्मूलनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. उत्तर आयुष्यात सुखात्मे यांनी आपले सर्व लक्ष पोषणाचा, विशेषतः भारतातल्या ग्रामीण भागातल्या पोषणाचा आभ्यास करण्यावर केंद्रित केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन करणारे सुखात्मे यांनी देशातील संख्याशास्त्राच्या शिक्षणाला आणि अध्ययनाला चालना देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.
Leave a Reply