गजाननराव उर्फ दादासाहेब तिरोडकर, यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी या छोट्याशा गावात झाला. असामान्य महत्वाकांक्षा व यशाच्या आभाळाला सहज गवसणी घालू शकणारी प्रखर बुध्दिमत्ता यांचा उत्तम संगम त्यांच्या ठायी झाला असल्या कारणाने त्यांचा ओढा हा कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा, स्वतःचा एखादा व्यवसाय थाटून त्यात इतरांपेक्षा काहीतरी वेगळे कार्य करण्याकडे होता. उद्योगविश्वात पाय रोवण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व मानसिक तयारी अंगी बाणविल्यानंतर त्यांनी ग्लोबल समुहाची बीजे पेरली. त्या काळात भांडवलाची फारसी उपलब्धता नसतानाही विश्वासु व होतकरू मनुष्यबळाच्या जोरावर त्यांनी उद्योगाचा श्रीगणेशा केला. कोकण परिसर म्हणजे तशी खाण्यापिण्याची ददातच होती. महाराष्ट्राच उद्योगधंद्यांच्या बाबतीत पिछाडीवर होता, त्यामुळे कोकणची काय अवस्था असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी. अशा आव्हानात्मक परिस्थींतींमध्ये, अतिशय धीरोदत्तपणे व आपल्या तत्वांवर ठाम राहून त्यांनी, रोवलेल्या उद्योगाच्या रोपट्याची प्राणापणाने व मायेने मशागत केली, या माळ्याच्या सच्च्या प्रेमामुळे, व हळुवारपणामुळे त्या रोपाचा गुलमोहोर व्हायला अवकाश लागला नाही. विज्ञान, व तंत्रज्ञानाची कास धरतानाच काळाची पावले ओळखून त्यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. फारसे शिक्षण नसताना, एका छोट्या कंपनीची स्थापना करण्याचे जे धैर्य त्यांनी दाखविले होते त्यास खरोखरीच तोड नव्हती.
सत्तरच्या दशकात, उद्योगधंद्यामध्ये प्रगती साधायची असेल तर विस्तार होणे गरजेचे होते आणि या विस्तारासाठी गरज होती भांडवलाची. गजानन यांची महाराष्ट्राला उद्योगधंद्यांमध्ये राष्ट्रीय किर्ती मिळवुन देण्याची केलेली भीष्मप्रतिज्ञा कदाचित परमेश्वराने
कली असावी कारण एका दानशुर व्यक्तीने त्यांच्यातील जिद्द व हुषारी ओळखुन त्यांना दहा लाख रूपये कर्जरूपाने दिले. हीच व्यक्ती पुढे त्यांच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या आयुष्यातील तारणहार ठरली, व या कर्जातुनच त्यांनी आपल्या कंपनीचा वेगाने विस्तार सुरू केला. फॅक्स यंत्रे तयार करण्याची कल्पना यामधून सुचली आणि तीही प्रत्यक्षात साकारलीही. ग्लोबलची फॅक्स यंत्रे देशात एकमेव असल्याचे सांगितले जाते. काळानुरूप दादासाहेबांनी आपल्या उद्योगाची सुत्रे पुत्र मनोज यांच्या कडे सोपविण्याचे निश्चीत केले. व्यवसायात असताना दादासाहेबांनी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्षपदाची धुरा काही काळ सांभाळली होती. तसेच विविध संस्थांवरही त्यांनी काम केले.
सामाजिक बांधिलकीचे भान असल्यामुळे त्यांनी ‘ग्लोबल फाउंडेशन’ ची स्थापना केली व कोकणातील छोट्या गावांमध्ये राहणार्या व ज्यांचा कधीही संगणकाशी संबंध न आलेल्या मुलांसाठी ‘नॉलेज ऑन व्हिल’ हा अनोखा उपक्रम सुरू केला. तळागाळातील प्रत्येक मुलाला संगणकाचे प्राथमिक ज्ञान असलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी विविध शाळांना फाउंडेशन च्या माध्यमातून मोफत संगणक उपलब्ध करून दिले. तसेच आरोग्यव्यवस्थेवरही त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले. रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशीलहान गावांत त्यांनी मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करून जनजागृतीचे काम केले. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होऊन प्रसंगी त्याला आर्थिक मदत देण्यातही ते नेहमीच अग्रेसर राहिले. जिद्द, चिकाटी, व सातत्य या त्रिवेणी गुणांचा उत्तम मिलाफ दादासाहेबांच्यात एकवटला असल्यामुळे सतत प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात राहणे त्यांच्यासाठी सहजशक्य होते परंतु त्यांचा मितभाषी व प्रसिध्दीपराड्:मुख स्वभाव त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत जपून ठेवला.
Leave a Reply