पूर्वीच्या काळी म्हणजे ज्यावेळी संगीत रंगभूमीची चलती होती आणि त्यानंतर जेव्हा बोलपटांचा जमाना सुरु झाला तेव्हा कलाकारांना काही अटी मान्य करुन (ज्या कलेसाठी अनुरुप होत्या) या क्षेत्रात पाऊल ठेवावं लागे, जसं की नाटकात जर का काम करायचं असेल तर गायन हे आलंच पाहिजे. संगीताचं ज्ञान असणं हे त्याकाळी कलाकारांसाठी बंधनकारक होतं, याचा फायदा पुढे अनेक कलाकारांना झाला ते म्हणजे चित्रपटात काम करताना. १९३० आणि ४० च्या दशकात तर कलाकारांनीच स्वत:च्या भूमिकांसाठी गीते गायली. यामध्ये अनेक नट-नटींची नावं घेता येतील, ज्यांनी एकाचवेळी कलेची ही विविधांगी रुपं मनापासून जोपासली आणि उत्कृष्टरित्या साकारली. त्यापैकीच एक नाव म्हणजे जयश्री कामुलकर आणि लग्नानंतरच्या जयश्री व्ही. शांताराम.
१९२२ साली मुंबईत जन्मलेल्या जयश्री कामुलकर यांचं बालपण गोव्यातील कोरगावातलं. वयाच्या दहाव्या वर्षानंतर त्यांचे काका त्यांना मुंबईत घेऊन आले. यामागे त्यांचा एकच हेतू होता की जयश्रीनी आपल्या मधुर आवाजाच्या बळावर कला क्षेत्रात भरघोस यश प्राप्त करावं. सुर आणि ताल याची जाण जयश्री कामुलकरांना अगदी सुरुवातीपासूनच होती. म्हणूनच गाण्यात पारंगत करण्यासाठी गामनखॉं यांची तालीम सुरु केली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांना गुजराती रंगभूमीकडून निमंत्रण आलं, ते त्यांच्यातील अभिनयाचे गुण पाहून. आणि एक बालकलाकार म्हणूनही त्यांचं नाव रंगभूमीवर सर्वतोमुखी झालं. इथूनच त्यांची मनोरंजन माध्यमाची कारकिर्द खर्या अर्थाने सुरु झाली. त्याकाळचे विख्यात संगीतकार मास्टर कृष्णराव यांच्याकडे त्यांनी गाण्याचे आणि संगीताचे रितसर धडे घेतले. यंग इंडिया कंपनीने त्यांच्या सुमधुर आवाजातील गाणीही ध्वनिमुद्रित केली.
अभिनय आणि संगीताची परिपूर्णता आणि रंगभूमीचा अनुभव गाठीशी असल्यानं जयश्री कामुलकरांना ”चंद्रराव मोरे”, ”नंदकुमार”, ”माझी लाडकी” यांसारख्या चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका मिळाल्या. या कारणानं त्यांची ओळख त्याकाळातील नामवंत दिग्दर्शक केशवराव धायबर, दादासाहेब यांच्याशी झाल्याने जयश्रीजींच्या अभिनयाला विविध पैलू मिळाले. त्याचकाळात प्रभात फिल्म कंपनीचा उदय होऊन त्यांच्या अनेक चित्रपटांनी जगात अक्षरश: कौतुकाचा वर्षाव पाहिला होता. कारण नवीन आव्हाने आणि त्याकाळातील चौकटी बाहेरचे विषय हे प्रभातच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य होतं. अशीच एक आगळी वेगळी निर्मिती ”शेजारी” या चित्रपटाची म्हणता येईल. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा हा चित्रपट सशक्त कथा, उत्कृष्ट संगीत आणि सर्वच कलाकारांचा जिवंत अभिनय यामुळे सुपरहिट ठरला. या चित्रपटात जयश्री यांना मध्यवर्ती नायिकेची भूमिका मिळाली. यामध्ये त्यांनी ग्रामीण ढंगाची आणि हिंदू तरुणीची भूमिका समर्थपणे साकारली. या चित्रपटातील ”लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया” आणि ”दिवाळी दिवाळी आली हासत” या दोन गाण्यांसाठी त्यांनी गायन सुद्धा केलं होतं. १९४८ साली प्रभात कंपनी बंद पडल्यानंतर व्ही. शांताराम यांनी राजकमल स्टुडिओ या संस्थेची मुंबईत स्थापना केली. राजकमलचे ”शकुंतला”, ”डॉ. कोटनीस की अमर कहानी”, ”दहेज”, ”परछाई”, ”सुबह का तारा” असे अनेक चित्रपटही गाजले. नवीन विषय, नवीन तंत्र आणि अशा चित्रपटांमध्ये जयश्रीजींचा अभिनयही खुलून दिसला. ‘कमल है मेरे सामने’ असं गात कमलपत्रांवर काय लिहावं यामुळे संकोचून गेलेली शकुंतला असेल किंवा ‘मै हू नन्ही नयी दुल्हन’ म्हणणारी नवथर नायिका चिंगलान असो, या दोन्ही चित्रपटात परस्पर विरोधी भूमिका साकारल्यानं प्रेक्षकही जयश्रीजींच्या चित्रपटांना दाद देऊ लागले. त्यानंतरही जयश्रीजींनी ”मेहंदी”, ”दीदी”, ”नया संसार”, ”हैदर अली”, ”अपना पराय”, ”दर्शन मला” या आणि अशा अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटात सशक्त भूमिका साकारल्या. व्ही. शांताराम यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतरही जयश्री शांताराम या चित्रपटात, रंगभूमीवर सक्रिय होत्या. त्यांच्या तिन्ही मुलांनी म्हणजेच राजश्री, तेजश्री आणि किरण शांताराम यांनी आपल्या आई-वडिलांचा कलेचा वारसा आजतागायत कायम राखलाय.
जेव्हा जेव्हा शांताराम प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा उल्लेख होईल किंवा प्रभातच्या उत्कृष्ट कलाकृतींचा विचार होईल तेव्हा नाजूक चेहर्याची, गोड गळ्याची, रुपसंपन्न नायिका म्हणून जयश्री शांताराम यांचं नाव कायमच स्मरणात राहिल.
Leave a Reply