आबासाहेब जर्हाड हे आय ए एस अधिकारी असून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहेत. ते अत्यंत विज्ञानवादी विचारांचे आहेत.
ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना सरकारी कामांमध्ये गतिमानता व अचूकता आणून सामान्य माणसाचा वेळ व शक्ती वाचविण्याचे श्रेय त्यांच्या कारकिर्दीला मिळाले आहे. जुन्या व किचकट अशा सरकारी पध्दतींवर विसंबुन न राहता प्रशासकीय कामांमध्ये गती व सहजता आणण्यासाठी त्यांनी लढवलेल्या अनेक भन्नाट कल्पनांना व योजनांना आज अपेक्षेबाहेर यश मिळाले आहे. दैनंदिन जीवनासाठी नागरिकांना सातत्याने लागणारे सरकारी दाखले मिळविता मिळविता पुर्वी नाकी नऊ येत असत. या सर्व प्रक्रियांमध्ये त्या बिचार्या अर्जदाराची, प्रचंड त्रेधा उडत असे. ह्या प्रक्रियेतील ताणली गेलेली गुंतागुंत कमी करण्याच्या हेतुने, व सुलभपणे हे दाखले अर्जदारांना मिळावेत या दोन कारणांसाठी त्यांनी सर्वप्रथम ठाणे जिल्ह्यात इंद्रधनु एकात्मित दाखले अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत, खास त्यांनी साचेबध्द केलेल्या पध्दतींची, आधीपासून दाखले वितरणासाठी अस्तित्वात असलेल्या पारंपारिक पध्दतींबरोबर सुंदर सांगड घालण्यात आली. एक खिडकी योजना, इ- सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्र, तसेच एक दिवसीय दाखले वाटप अभियान अशा अभिनव योजनांद्वारे त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया व हस्तचलित व्यवस्थेमधला सुवर्णमध्य गाठला.
संगणकाचा योग्य वापर कुठल्याही कामामध्ये किती गती आणू शकतो हे लोकांच्या मनावर बिंबवणारी अनेक दाखले वाटप शिबीरेही त्यांनी आयोजित केली. नियोजनबध्द व्यवस्थापन व संगणकीय युगाची कास धरणारा त्यांचा हा उपक्रम ग्रामपातळीवरती भलताच यशस्वी ठरला. ठाणे जिल्ह्यात त्या वर्षी, ५३ शिबीरांच्या माध्यमातुन तब्बल ३६ हजार २७० दाखले कुठल्याही चुकीविना वितरीत झाल्यामुळे, या प्रकल्पाची किर्ती अख्या महाराष्ट्रामध्ये पसरली. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, विशेष दाखले अभियानांचा वापर करून अत्यंत जलद गतीने दाखले वाटप मोहिमा सुरू करण्यात आल्या. लोकांचा वेळ व उर्जा फुकट जाऊ नये, या तत्वावर त्यांची अटळ श्रध्दा असल्यामुळे, त्यांच्याच मार्गदर्शनान्वये राज्यात सर्वप्रथम पासपोर्टच्या पध्दतीप्रमाणे, दाखल्यांचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली. विशेषतः या दाखलेअभियानांतर्गत गतवर्षी ठाणे जिल्ह्यात एकूण ५,३७७५६ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या मोहिमेची दखल घेवून शासनाने राज्यभर हा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी क्षेत्रातही त्यांनी आपल्या प्रतिभेची मोहोर उमटविताना गोर गरीब आदिवास्यांकरिता हजारो योजना, व कार्यक्रमांचा, आशावादी पाऊस पाडला आहे. यापैकी त्यांचे कल्पक नेतृत्व लाभलेली, व जमिनीची भुजल पातळी नियंत्रित करणारी सिंचन विहीर योजना ठाण्यामधील कितीतरी दुष्काळग्रस्त भागांमध्ये पुनर्वसनाचे काम उत्तम करीत आहे. याशिवाय दुरच्या गावांमध्ये राहणार्या विद्यार्थ्यांना खगोल शास्त्राची इत्यंभुत माहिती मिळावी, म्हणून त्यांनी सुरू केलेले तारांगण आपल्या दारी हा उपक्रम त्यांच्या वैज्ञानिक तळमळीची साक्ष देण्यास समर्थ आहे.
ठाणे जिल्हा विस्तृत क्षेत्रफळाच्या कक्षेत पसरला आहे. आप्तकालीन परिस्थिती व्यवस्थापनाचा १ भाग म्हणून आधुनिकतेने एस.एम.एस. लास्टर पध्दतीचा अवलंब सर्वप्रथम त्यांनी सुरू केला. याद्वारे आप्तकालीन परिस्थितीत तात्काळ संदेश देण्यासाठी या पध्दतीद्वारे एकाचवेळी अनेकांना संदेश देता येतो. मोगरा लागवड अभियान हा त्यांच्या तल्लख व आभ्यासु चिकाटीपासून जन्माला आलेला प्रकल्प आजही हजारो आदिवासी कुटुंबियांच्या जीवनातील दीपस्तंभाचे काम करीत आहे. मोखाडयासारख्या आदिवासी भागामध्ये, जिथे अत्यल्प जमिन धारणा पाहावयास मिळते, मोगरा लागवड केल्यास तिथल्या स्थानिकांशी आर्थिक घडी व्यवस्थित बसू शकेल, हे त्यांच्या ध्यानात आल्यानंतर या अभियानास जोमाने सुरूवात झाली आहे.
Leave a Reply