(जन्म १९४९)
अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड दी कॉसमॉस’ या खगोलभौतिकशास्त्र आणि गुरुत्वाकर्षणासंबंधी संशोधन करणार्या संस्थेचे संचालक.
महाराष्ट्रातील शिरपूर येथे जन्मलेल्या अभय अष्टेकरांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी आपल्या संशोधनाला अमेरिकेतील शिकॅगो विद्यापीठातून सुरुवात केली.
सापेक्षतावाद आणि पुंजवादाला एकत्र आणणार्या पुंजकीय गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात अभय अष्टेकरांनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली आहे. जिथे व्यापक सापेक्षतावादाच्या मर्यादा स्पष्ट होतात अशा अत्यंत घन स्वरूपातल्या पदार्थांशी निगडीत परिस्थितीत अष्टेकरांनी विकसीत केलेल्या सिद्धांताचा वापर करता येतो. विश्वनिर्मितीनंतरच्या काही क्षणांच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या सिद्धान्ताद्वारे महास्फोटाच्या अगोदरच्या स्थितीचाही विचार करणे शक्य झाले आहे. या सिद्धांतात वापरल्या गेलेल्या चल राशींना अष्टेकरांच्या नावे ओळखले जाते. अष्टेकरांनी कृष्णविवराच्या निकटच्या परिस्थितीलाही हा सिद्धान्त लागू केला आहे. विविध ख्यातनाम संस्थांतून मानद पदे भूषवणारे अष्टेकर हे अनेक जगन्मान्य नियतकालिकांच्या संपादनाशीही संबंधित आहेत.
— माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply