महाराष्ट्रातील अहमदनगर शहरातील एक छोटंसं गाव चिचोंडी ! विक्रम संवत् १९५७ मध्ये श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदेला या गावी ऋषीतुल्य आनंदऋषी महाराज यांचा जन्म झाला आणि या गावाचं भाग्य उजळलं. गावाला तीर्थाचं महत्त्व प्राप्त झाले.
या गावातील सेठ देवीचन्दजी यांच्या दोन पुत्रांपैकी हा धाकटा मुलगा नेमिचन्दजी, ज्याला त्याचे बालसवंगडी कौतुकाने गोटीराम म्हणून हाक मारीत असत. परंतु इतरांसाठी ते नेमिचन्दजीच होते. त्यांच्या मातोश्री हुलसाबाई या स्वभावाने अतिशय कोमल, मधुर आणि सात्त्विक होत्या. त्यांचे हेच गुण वारसा म्हणून नेमिचन्दजींना म्हणजेच पू. आनंदऋषीजी महाराजांना मिळाले होते. याच स्वभावातील सात्त्विकतेमुळे त्यांच्याकडून समाजाचे हित साधले गेले. आनंदऋषीजी महाराज यांच्या वडिलांचे त्यांच्या लहानपणीच निधन झाले; परंतु यांची आई हुलसाबाई ही फार कणखर स्त्री होती. पदरी लहान लहान दोन मुलं असताना तिने स्वतःच्या हिमतीवर मुलांचं चांगल्या तर्हेने पालन-पोषण केले. विशेष म्हणजे त्या संपूर्ण स्वावलंबी जीवन जगल्या आणि मुलांनाही त्यांनी तेच संस्कार दिले.
आनंदऋषीजी महाराज यांच्या वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांच्या बोलण्यातून ध्रुवाप्रमाणे दृढता व्यक्त होत असे. गायनाची ईश्वरी देणगी त्यांना प्राप्त होती. परंतु वडिलांच्या निधनानंतर मात्र त्या दुःखामुळे त्यांना एक प्रकारची विरक्तता आली. आईचा आग्रह असूनसुद्धा त्यांनी लग्न न करता आजीवन ब्रह्मचारी राहण्याचे ठरविले. १९७० मध्ये पूज्यपाद रत्नऋषीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यादिवसापासून ‘आचार्य आनंदऋषीजी महाराज’ अशी त्यांची जगाला ओळख झाली.
संस्कृत, प्राकृत, हिदी, मराठी, राजस्थानी, उर्दू व इंग्रजी इत्यादि भाषांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांनी समाजातील विविध संप्रदायींना संघटीत करण्याचे कार्य केले. त्यांच्या अलौकिक कार्याने ते श्रमण संघाचे प्रमुख मानले जाऊ लागले. त्यांनी सहयोगयुक्त सामाजिक जीवनाचा संदेश दिला. अनुशासन हे जबरदस्तीने नव्हे तर सहजभावाने असले पाहिजे असे त्यांचे मत होते. अद्ययावत विचारांच ‘ऋषी’ म्हणून त्यांचा लौकिक होता. सौम्य, शांत, विनम्र स्वभावाचे आचार्य आनंदऋषीजी महाराज सुसंस्कृत व चारित्र्यवान आणि ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्वाने अखेरपर्यंत तळपत राहिले.
Leave a Reply