लळीत, (अॅड.) उदय

भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा “२जी स्पेक्ट्रम” घोटाळ्याचा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु झाला, त्यात केंद्रिय गुप्तचर विभाग (सी.बीआय.) आणि अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) या दोन तपासणी यंत्रणांच्या वतीने अभियोग चालवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने उदय लळीत यांच्यावर टाकली आहे. ५५ वर्षीय उदय लळीत हे मूळ रायगड जिल्ह्यातील आपटा गावचे (ता.रोहे), वकिली पेशा हा वारसा म्हणूनच त्यांना मिळाला त्यांचे आजोबा हे “आपटा” हून सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने आले तसच त्यांचे वडिल उमेश लळीत हे सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने नाम निर्देशित केलेले ज्येष्ठ वकील व १९७४ ते १९७६ या काळात ते उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. उदय लळीत यांच्या आजी त्या काळातील काही मोजक्या महिला डॉक्टरांपैकी एक होत्या. उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातनं शिक्षण पूर्ण करुन, सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ वकील एम.ए. राणे यांच्याकडे वकिली केली. त्यानंतरची जवळपास ६ वर्षं त्यांनी ज्येष्ठ विधीज्ञ सॉलिसिटर रोराबजी यांच्या जवळचे सहकारी म्हणूनही काम केलं आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून उदय लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्ररित्या वकिली करत असून २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकिल म्हणूननामनिर्देशित केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिल म्हणून ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत, त्यासोबतच १४ राज्य सरकारांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रकरणं चालवली आहेत. भारतातील बहुतेक सर्वच न्यायालयांमध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण युक्तीवाद केले आहेत. १७० लाख कोटी रुपयांच्या २-जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याशी संबंधित अभियोग चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या अनुच्छेद १४२ अन्वये विशेश अधिकाराचा वापर करुन अॅड. उदय लळीत यांची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केल्यानं, महाराष्ट्राच्या वकिलीला सुज्ञ व कुशलतेची व सोबतच तरबेज असल्याची पोचपावती मिळाल्याचं म्हणता येईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*