अमित भंडारी हे एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीवर दररोज झळकणारा एक लोकप्रिय पत्रकार आहे. दिलखुलास गप्पा मारून समोरची व्यक्ती कितीही छोटी किंवा मोठी का असेना, तिला बोलतं करण्याची कला अमितला उत्तमरित्या जमते. आजवर अनेक मराठी व हिंदी भाषेशी जोडले गेलेले कलाकार, व्यावसायिक, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा,
अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंफल्या गेलेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती त्याने सारख्याच सहजतेने व त्याच्या मिश्कील शैलीमध्ये घेतल्या आहेत. ढॅणटॅढॅण, रिमोट माझा अशा प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमांमधून तो दररोज आपणास भेटायला येत असतो, नव नवीन खुमासदार व खमंग विषयांवर विश्लेषण व चर्चासत्रे आयोजित करत असतो. कुठलाही नवा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचं परीक्षण व उत्तम समिक्षा करत असतो. अमितचा जन्म २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत झाला. त्याचे शालेय शिक्षण राजा शिवाजी विद्यालय तर महाविद्यालयीन शिक्षण माटुंग्यातील आर. ए. पोदार कॉलेजमधुन घेतले. अनेक सण, समारंभ, व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेवून त्याने त्याच्यामधील गोष्टिवेल्हाळ, बोलघेवड्या, परंतु आभ्यासु पत्रकाराची प्रचिती सर्वांना आणून दिली होती. अमितचे वक्तृत्व व इतरांशी संवाद साधुन त्यांना बोलत करण्याचे कौशल्य अप्रतिम होते. स्टार माझामध्ये रिपोर्टर झाल्यावर अल्पावधीतच त्याने वाहिनीचा व प्रेक्षकांचा विश्वास जिंकुन घेतला होता. विविध कार्यक्रमांमधून उत्साही सहभाग घेत त्याने स्वतःच्या नावाभोवती वेगळेपणाचे वलय निर्माण केले. अमितला उत्तम वृ्त्तांकनासाठी अनेकवेळा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
पत्रकारिता सांभाळता सांभाळता अमित फावल्या वेळात अवांतर वाचन व लेखन या कलांनासुध्दा वेळ देतो. अजय अतुल या संगीतरत्नांची त्याने घेतलेली मुलाखत, पीट सॅमप्रस या जागतिक खेळाडुचे रंगविलेले व्यक्तिचित्रण तसेच अमिताभ बच्चनच्या बुढा होगा तेरा बाप या चित्रपटाची समिक्षा विशेष गाजली.
Leave a Reply