महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे अनेक भक्तीगीते व भावगीतांचे ख्यातनाम गीतकार, नाटककार अनंत पाटील यांचा जन्म २२ डिसेंबर १९४१ रोजी झाला.
महाराष्ट्र असू दे की सातासमुद्रापार प्रत्येक मराठी घरात ‘सत्यनारायण पुजेच्या वेळी लागणारे ‘ऐका सत्यनारायणाची कथा’, प्रत्येकाला जीवनाचे सार सांगणारं ‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळं देतो रे ईश्वर’ हे भावगीत असो की ‘चल गं सखे पंढरीला’, ‘दींडी चालली’, ‘रंजलो गांजलो’, ‘पाहिला मी डोळा, पंढरीचा सोहळा’, ‘वाट पंढरीची’, तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, आता तरी देवा मला पावशील का? यासारख्या हजारों विठ्ठल अभंगांची साद असो. गणेश वंदना,भारुड, कविता, अभंग, भावगीत, कोळीगीत, लग्नगीत, शोकगीत, बालगीत, समूहगीत, प्रबोधनपरगीत, लावणी, पोवाडा, कव्वाली, गझल, शेरोशायरी अशा असंख्य रचना अनंत पाटील यांनी रचल्या.
आगरी-कोळी बोलीभाषेतील त्यांचं साहित्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. एवढंच नाही तर ‘आम्ही कोली दर्याचे राजे हाव’ ,’चिंबोरी हानली बारानची’, ‘आगिनगारी बोलतेय बेगिनगारी’, ‘हातानं भरल्या हिरव्या बांगड्या’, ‘आज कोलीवा-यात’, ‘एकविरा आई माझी सत्वाची माउली’, ‘एकीरा मातोसरी’ यांसारखी मनामनावर राज्य करणारी गीते त्यांनी रचली.
२००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.
आजमितीला त्यांची एकूण ३२ ‘अनंताची अभंग भजने’, ‘अनंताची अभंग गीते’ व ‘कोळीगीते व नृत्यगीते’ या शीर्षकाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. टी सिरिज, एच.एम.व्ही, कृणाल यांसारख्या प्रख्यात ध्वनीकंपन्यांची रेकॅार्ड कॅसेटस् यांचा आकडा सहज सांगता येण्यासारखा नाही.
अनंत पाटील यांचे २६ मार्च २०१० रोजी निधन झाले.
Leave a Reply