अरूण होर्णेकर या माणसाला नेमका पकडून त्याला ‘ध्यास पुरस्कार’ देण्याची योजकता विनोद पवार आणि महेंद्र पवार या सांस्कृतिक क्षेत्रातील दोन चळवळ्या माणसांनी दाखवली, त्याबद्दल खरे तर त्यांचेच अभिनंदन करायला हवे. कारण अरूण सारखी एका वेडाने झपाटून काम करणारी माणसे कलाक्षेत्रात आहेत म्हणूनच तर त्या क्षेत्राची स्वायत्तता टिकून आहे. व्यावहारिक लाभासाठी किंवा व्यावहारिक गरजा भागल्यावर आत्मतृप्तीसाठी कलाक्षेत्राकडे येणारे शंभरातले नव्याण्णव कलावंत आहेत, परंतु स्वत:ची झोळी रिती असतानाही निरपेक्षपणे कलाक्षेत्रात सतत असणारा आणि तिथल्या मिळालेल्या क्षणांत आनंद शोधत स्वत:तच दंग राहणारा अरूण होर्णेकर सारखा एखादाच असतो.
गेली साडे तीन दशके तरी तो नाट्यक्षेत्रात सहज आहे. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये थिएटर ऑफ अॅब्सर्डच्या अचाट प्रयोगांपासून ते कालच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ पर्यंत तो सतत काही ना काही करून बघत असतो. इतकी वर्षे या क्षेत्रात वावरूनही त्याच्यात बनचुकेपणा आलेला नाही, हे एक आश्चर्यच आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘अमृत नाट्य भारती’मध्ये त्याने पहिल्यांदा ‘गोदो’मधला लकी केला होता. त्यानंतर मागच्या वर्षी जुन्या ‘गोदो’तले त्याचे सहकारी अनंत पणशीकर यांनी पुन्हा बेकेटचे तेच अभिजात नाटक रंगभूमीवर आणले ते प्रायश: अरूणसाठी आणि या नाटकात काम करायला एका पायावर तयार झालेल्या टॉम ऑल्टरसाठी. टॉमनेही अरूणच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक करताना खूप मोकळे वाटल्याचे सांगितले. दिग्दर्शक म्हणून अरूणचे हे वैशिष्ट्य आहे की, तो आपल्या कलाकारांना पूर्णपणे फुलू देतो आणि त्यांच्यातील सार्मथ्यस्थळांचा वापर करतो. तो स्वत: नट म्हणून फार मोठ्या समजल्या जाणाऱ्या भूमिकांना सहज भिडला आहे. उदाहरणार्थ, खानोलकरांच्या ‘एक शून्य बाज राव’मधली माधव वाटव्यांनी गाजवलेली प्रमुख भूमिका त्याने सहजी केली.
कुठल्याही भूमिकेत शिरून तिची मजा लुटणे, ही चांगल्या नटाची खूण त्याच्यात ठसठशीतपणे आहे. म्हणूनच ‘सख्खे शेजारी’ सारखा विनोदी रेव्ह्यू असो की ‘कुणी तरी आहे तिथं’ यासारखे रहस्यप्रधान नाटक, अरूणचे त्यातले असणे लक्षणीय ठरते. अन्य कोणताही कामधंदा न करता आणि नाटकात कामे मिळवण्याची अजिबात खटपट न करताही अरूण या क्षेत्रात खांबासारखा उभा आहे. तो स्वत: याला ध्यासबिस काही म्हणणार नाही, पण ते जे काही आहे ते निश्चितच गौरवास पात्र आहे.
Leave a Reply