अरविंद टिकेकर मुंबई विद्यापीठाच्या गंथालयाचे मुख्य गंथपाल म्हणून इतरांसमोर प्रकाशात आले. या मानाच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते त्यांच्या आवडीच्या ग्रंथपालन शास्त्रात मन:पूर्वक रमले होते. किंबहुना, नोकरीपेक्षाही अधिक व्यग्र झाले होते. ज्ञानक्षेत्रातली वाटचाल टिकेकरांच्या रक्तात वारसाहक्कानेच आली होती. त्यांचे काका श्री. रा. टिकेकर यांचा विविध विषयांमधला अधिकार, त्यांची चिकित्सावृत्ती आणि अभिजात अभिरुची यांचा संस्कार अरविंद आणि अरूण या दोन्ही भावांवर झाला. अरविंद टिकेकर यांची गंथपाल म्हणून जी जडण-घडण झाली तीच मुंबई विद्यापीठाचे दंतकथा बनलेले मुख्य गंथपाल प्राध्यापक दारा मार्शल यांच्या हाताखाली. टिकेकर यांनी मार्शल यांचा हा वारसा सांभाळला, संपन्न केला.
मुंबई विद्यापीठाचे समृद्ध गंथालय नावाजले जाते, तसाच विद्यापीठाचा गंथपालनशास्त्र विभागही. या विभागाचा विकास तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून डॉक्टरेटचे संशोधन होऊ शकणार्या अद्ययावत विभागापर्यंत झाला. या विकासातही टिकेकर यांचा मोठा वाटा होता. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते मागच्या पिढीचे असले तरी आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत स्वागतशील होते. त्यामुळेच गंथालय व्यवस्थापनातील संगणकांच्या तसेच इंटरनेटच्या वापराचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. बदलत्या जगाची व ‘ग्लोबलायझेशन’च्या वार्यांची टिकेकरांना चांगलीच कल्पना होती. त्यामुळे आता कोणतेही ग्रंथालय आणि ग्रंथपाल एकेकटे असूच शकत नाहीत. ते परस्परांशी अनिवार्यपणे जोडलेलेच असणार आणि त्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून ज्ञानसंस्कृती पुढे जाणार, असे प्रतिपादन ते करत.
टिकेकरांनी निवृत्तीनंतर गावोगाव असंख्य कार्यशाळा घेतल्या. तसेच अनेक गंथालयांची नव्याने व्यवस्था लावली. अशा ग्रंथालयांमध्ये अगदी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाच्या ग्रंथालयाचाही समावेश होता. असे कोणतेही ग्रंथालय त्यांनी सुसज्ज केले की ”आमच्यासाठी आणखी काही काळ येथेच राहा” असा आग्रह सुरू होई. नव्या युगात वाचनसंस्कृती जपायची कशी, याचीही काळजी त्यांना वाटे. त्यावरचे अनेक उपाय त्यांच्या पोतडीत असत. वृद्धांना ग्रंथालयात येता येत नसेल, तर त्यांना घरपोच पुस्तके पोहोचवा, ही त्यांची कल्पना शहरांमध्ये किती महत्त्वाची होती! जन्मभर एखाद्या विषयाचा ध्यास लागणे आणि त्याच विषयात मनोजोगते काम करायला मिळणे, हा योग दुर्मीळ. हा आनंदयोग टिकेकरांनी शेवटपर्यंत अनुभवला.
( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स )
Leave a Reply