केतकीच्या बनी.. नाचला ग मोर’ या नाचऱ्या आणि चित्रमयी शब्दकळेचे गीतकार अशोक परांजपे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे झाला.
नाटककार गो. ब. देवल हरिपूरचेच. त्यांचा सार्थ अभिमान अशोकजींना होता. ग्राम संस्कृती आणि नागर संस्कृती, लोकरंगभूमी आणि नागर रंगभूमी अशा दोन स्वतंत्र विचारधारांमधील महत्त्वाचा दुवा म्हणजे अशोकजी परांजपे, त्यांचा प्रकृती पिंड गीतकाराचा. ललित लेखनात त्यांना विशेष रुची होती.
दीनानाथ दलाल यांची चित्रे आणि अशोक परांजपे यांच्या काव्यपंक्ती असा सिलसिला अनेक दिवाळी अंकात सुरू असायचा. मुंबईत गिरगावातील झावबावाडीतील नॅशनल होस्टेलमध्ये अशोक परांजपे राहात. संध्याकाळी त्यांच्या गप्पा रंगत साहित्य संघाच्या कट्टय़ावर.
गीतकार, चित्रकार, नाटककार, लोककलेचे अभ्यासक अशा विविध भूमिकांमधून अशोकजी परांजपे यांनी मराठी लोकसंस्कृतीवर आपला आगळावेगळा ठसा उमटविला होता. अतिशय संवेदनशील, गप्पांमध्ये रंगणारे आणि गप्पा रंगविणारे अशी अशोकजींची प्रतिमा होती. त्यांना सतत लोकांतवास आवडत असे.
“जांभूळ आख्यान’, “खंडोबाचे लगीन’, “दशावतारी राजा’, “वासुदेव सांगती’ अशा अनेक कलाकृती त्यांची आठवण करून देत राहतात. मुंबईच्या इंडियन नॅशनल थिएटर्सचे संचालक म्हणून काम पाहतानाही आणि त्यानंतरही कलाक्षेत्राशी जुळलेले त्यांचे नाते अखेरपर्यंत कायम होते. अशोक परांजपे यांचे ९ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
Leave a Reply